
लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना उपोषणाच्या 21 व्या दिवशी शनिवारी दिल्ली पोलिसांनी जंतरमंतर येथून हटवून सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत त्यांच्या पत्नी गीतांजली जे. अंगमो यांनी रुग्णालय प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, त्यांच्या पूर्वसंमतीशिवाय वांगचुक यांना तोंडावाटे किंवा इंजेक्शनवाटे कोणतेही औषध अथवा उपचार देऊ नयेत.
गीतांजली अंगमो यांनी ‘एक्स’ (X) वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “मी सफदरजंग रुग्णालयात आहे. माझ्या, त्यांच्या कुटुंबाच्या आणि गेल्या 20 दिवसांपासून त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणाऱ्या डॉक्टरांच्या संमतीशिवाय सोनम वांगचुक यांना तोंडावाटे किंवा इंजेक्शनवाटे काहीही देऊ नका.”
I am at Safdarjung hospital in Delhi where @Wangchuk66 has been admitted. Nothing should be administered to him orally or intravenous without take consent from me, his family and his doctors who have been monitoring his health for the past 20 days.
— Gitanjali J Angmo (@GitanjaliAngmo) July 18, 2026
त्यांनी पुढे असा दावा केला की, शुक्रवारी वांगचुक यांची प्रकृती स्थिर होती आणि ते ठीक दिसत होते. त्यामुळे त्यांना अचानक रुग्णालयात दाखल करण्यामागील कारणांवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. असे वृत्त इंडिया टुडे ने दिले आहे.
सोनम वांगचुक 28 जूनपासून जंतरमंतर येथे विविध मागण्यांसाठी उपोषण करत आहेत. त्यांच्या प्रकृतीची चिंता व्यक्त करत दिल्ली पोलिसांनी शनिवारी त्यांना तेथून हलवून सरकारी सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. या कारवाईनंतर त्यांच्या समर्थकांकडून तसेच कुटुंबीयांकडून तसेच राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.



























































