हर हर महादेव! मुसळधार पावसामुळे स्थगित करण्यात आलेली अमरनाथ यात्रा सुरू, 15000 भाविकांचा जथ्था रवाना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या सहा दिवसांपासून संततधार पावसामुळे स्थगित करण्यात आलेली श्री अमरनाथ यात्रा शनिवारी पुन्हा सुरू झाली आहे. प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेत हा निर्णय घेतला असून, हवामाना सुधारणा झाल्यामुळे शनिवारी पहाटे यात्रेकरूंना जम्मूहून केवळ बाल्टाल मार्गानेच प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. पहलगाम मार्गाने यात्रा सुरू करण्याबाबतचा निर्णय मार्गाची सद्यस्थिती आणि हवामानाच्या अंदाजानुसार नंतर घेतला जाणार आहे.

ही यात्रा बाल्टाल मार्गाने सुरू होणार असल्याचे कळताच जम्मूमध्ये अडकलेल्या शिवभक्तांमध्ये आनंदाची लाट पसरली. भक्तांनी एकमुखाने ‘हर हर महादेव’ आणि ‘जय बाबा बर्फानी’चा जयघोष केला. गेल्या सहा दिवसांपासून जम्मूतील भगवती नगर बेस कॅम्पमधील भाविक निवास आणि लंगरमध्ये अडकलेले सुमारे 15 हजार यात्रेकरू यात्रेच्या प्रतीक्षेत होते. दुपारनंतर हवामान निवळल्याने यात्रेकरूंमध्ये आशा निर्माण झाली होती. सायंकाळी भगवती नगर येथील यात्री निवासमध्ये बाल्टालहून यात्रा सुरू होण्याची अधिकृत घोषणा होताच, तिकीट काउंटर परिसरात एकच लगबग उडाली आणि उपस्थितांचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावले.

दुसरीकडे, भूस्खलनामुळे बाधित झालेला जम्मू-श्रीनगर महामार्ग सुरळीत करण्याचे काम दिवसभर युद्धपातळीवर सुरू होते आणि सायंकाळी तो पूर्ववत वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. दोन दिवसांपूर्वी अनंतनागमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संपूर्ण मार्गावर सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक केली असून, विविध ठिकाणी सुरक्षा दल आणि लंगर संघटना सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, माता वैष्णो देवीची यात्रा पुन्हा सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसला, तरी त्यावर लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता असून कटरा येथे सुमारे 15 हजार भाविक प्रतिक्षेत आहेत.