
मुसळधार पावसामुळे सूर्या नदीला आलेल्या महापुराचा मोठा तडाखा तारापूर औद्योगिक क्षेत्राला बसला आहे. नदीची पाणीपातळी धोक्याच्या पातळीपेक्षा सुमारे तीन मीटरने वाढल्याने एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारे जॅकवेल पंपगृह आणि विद्युत उपकेंद्रात पाणी घुसले. त्यामुळे मध्यरात्री २ वाजल्यापासून १५०० उद्योगांसह तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे.
सूर्या नदीची धोक्याची पातळी १२ मीटर असताना सध्या नदीचे पाणी सुमारे १५ मीटर उंचीवरून वाहत असल्याने जॅकवेल पंपगृह परिसर जलमय झाला.
वाढत्या पुराचा धोका लक्षात घेऊन रात्री १२ वाजण्याच्या सुमारास पंपगृहात कार्यरत असलेल्या पाच कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले, त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
पुराचे पाणी इतक्या वेगाने वाढले की पंपगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाच फुटांहून अधिक उंचीचे पाणी वाहत आहे. त्यामुळे पुराचे पाणी ओसरेपर्यंत जॅकवेल परिसरात प्रवेश करणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
९७ विजेचे खांब कोसळले
पालघर जिल्ह्यात २२ ते २४ जुलै रोजी सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने वीज वितरण यंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात ५२ उच्चदाब (एचटी) आणि ४५ लघुदाब (एलटी) विद्युत खांब कोसळले असून ६.२४ किलोमीटर उच्चदाब आणि २.५० किलोमीटर लघुदाब वीजवाहिन्या तुटल्या आहेत. याशिवाय ६ डीपी कोसळले आहेत. तसेच २५ वितरण रोहित्र केंद्रे निकामी झाली आहेत. तर १० ऊर्जा फिडर्सचेही नुकसान झाले आहे. सध्या आच्छाड, आमगाव, सावरोली, बोर्डी, अशागड, दापचरी आणि डोलारपाडा या उपकेंद्रांच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे.



























































