भाजप नगरसेवकांकडून सभागृहाची शिस्त खुंटीला; भरसभेतच गप्पांचा कट्टा, विरोधकांच्या सूचनेकडे महापौरांचाही काणाडोळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणेकरांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित असलेल्या पीएमपीएमएलच्या कारभारावर महापालिका सभागृहात गंभीर चर्चा सुरू असताना भाजपच्या काही नगरसेवकांनी मात्र सभागृहातच गप्पांचा कट्टा रंगवल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा सुरू असताना लोकप्रतिनिधींचा हा निष्काळजीपणा आणि त्याकडे सभापीठाने केलेले दुर्लक्ष, यामुळे महापालिका सभागृहाच्या कामकाजाच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महापालिकेची सर्वसाधारणसभा सकाळी ११ वाजता सुरू झाली. दुपारच्या भोजनावकाशानंतर ३ वाजता कामकाजाला पुन्हा सुरुवात झाली. यावेळी पीएमपीएमएलच्या कारभारासह शहरातील विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू असतानाच, साडेतीनच्या सुमारास भाजपचे काही नगरसेवक आपल्या जागा सोडून सभागृहाच्या मागील बाजूस सेवकांच्या खुर्च्यांवर एकत्र येऊन गप्पांमध्ये रमल्याचे चित्र पाहायला मिळाले. तब्बल सुमारे पाऊण तास संबंधित नगरसेवक चर्चेत सहभागी न होता परस्परांशी संवाद साधत होते.

या गप्पांच्या कट्ट्यात नगरसेविका मानसी देशपांडे, स्मिता वस्ते, वर्षा तापकीर, नगरसेवक श्रीकांत जगताप, राजेंद्र शिळीमकर सहभागी झाले होते. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, प्रवाशांच्या समस्या आणि पीएमपीएमएलच्या कामकाजावर चर्चा सुरू असताना संबंधित नगरसेवकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र होते.

महापौरांच्या निदर्शनास आणूनदेखील दुर्लक्ष!

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे गटनेते काका चव्हाण यांनी हा प्रकार महापौरांच्या निदर्शनास आणून देत, महापौर सभागृहात आणखी एक सभागृह सुरू आहे का? असा टोला लगावला. मात्र, या सूचनेकडे दुर्लक्ष करत सभापीठाने कोणतीही कारवाई केली नाही. संबंधित नगरसेवकांना समज देणे किंवा आपल्या जागेवर बसण्याच्या सूचना करण्याचेही टाळण्यात आल्याने सभागृहातील शिस्तीबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.