
मुंबई-नाशिक महामार्गावर असलेल्या आसनगाव उड्डाणपुलावरील रस्त्याला ठिकठिकाणी तडे गेले असून सर्व्हिस रोडलाही भगदाड पडले आहे. त्यामुळे लाखो प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. वाहनचालकांच्याही सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून वर्षभरातच रस्त्याला तडे गेल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान संबंधित ठेकेदार कंपनीची चौकशी करून रस्त्याच्या कामाचे ऑडिट करावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावरील आसनगावजवळ चौफुली रस्ता असल्याने तिथे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत असे. त्यामुळे अनेकदा अपघातही झाले आहेत. ही कोंडी फोडण्यासाठी उड्डाणपूल बांधण्यात आला. मात्र एक वर्षापूर्वीच उभारलेल्या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून आले आहे. पुलावरील रस्त्याला दहा फुटांपेक्षा जास्त लांबीचे व एक ते दोन इंच रुंदीचे ४ ते ५ ठिकाणी तडे गेले आहेत. तसेच रस्त्याच्या बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडला मोठे भगदाड पडले आहे.





























































