धारावी पुनर्विकास प्रकल्पात आठ हजार झाडांवर कुऱ्हाड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धारावी पुनर्विकास प्रकल्पामुळे सुमारे 8 हजार झाडे बाधित होणार आहेत. त्याची भरपाई म्हणून भविष्यात 30 हजारांहून अधिक झाडे धारावी परिसरातील उपलब्ध मोकळ्या जागांमध्ये लावण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 1693 झाडांच्या बदल्यात 22,904 झाडे लावली जाणार आहेत.

नव्याने लावण्यात येणाऱ्या झाडांची सात वर्षे देखभाल करण्याची जबाबदारी प्रकल्पाची विकासक कंपनी नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी स्वीकारली आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 871  झाडे तोडण्यात येणार आहेत, तर 822  झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. या बदल्यात पालघर जिह्यातील चहाडे गावातील 90 एकर जागेवर 22,904  स्थानिक प्रजातींची झाडे लावण्याचे हमीपत्र कंपनीने महापालिकेला दिले आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या उद्यान विभागाकडे सादर करण्यात आला आहे. कंपनीने दिलेल्या हमीपत्रानुसार, झाडे तोडल्यानंतर 15  दिवसांच्या आत 22,904 नवीन झाडांची लागवड केली जाईल.

आणखी 1443  झाडे तोडणार

महापालिकेच्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांसह इमारत बांधकामांमुळे शहरात 1443 झाडे बाधित होणार असून त्यापैकी 902 झाडे तोडण्याचा आणि 541 झाडांचे पुनर्रोपण करण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणासमोर ठेवण्यात आला आहे. या बदल्यात 21625 नवीन झाडे लावण्याची तरतूद करण्यात आली आहे.