मुंबई विद्यापीठातील पेपरफुटीची सीआयडी चौकशी होणार, युवासेनेच्या पाठपुराव्याला यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या परीक्षेचे तीन पेपर फुटल्याच्या प्रकरणाची सीआयडी चौकशी होणार आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने त्यास मंजुरी दिली असून राज्य सरकारला याविषयी पत्र लिहिले जाणार आहे. याप्रश्नी युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यास यश आले आहे.

वाणिज्य शाखेच्या सहाव्या सत्राची परीक्षा 9 ते 15 एप्रिल 2026 दरम्यान पार पडली. या परीक्षेच्या पेपरफुटीसाठी विद्यापीठाच्या आयडॉल विभागातील तीन अस्थायी क आणि ड वर्गाच्या कर्मचाऱयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. युवासेनेच्या रेटय़ामुळे याप्रकरणी 23 एप्रिल 2026 रोजी फौजदारी गुन्हा दाखल झाला. युवासेनेने मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार ऍड. अनिल परब यांना पेपरफुटीची माहिती दिली. अनिल परब यांनी हा विषय विधान परिषदेत मांडला. त्यावर उत्तर देताना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत यावर निर्णय होईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते. मात्र त्यानंतर व्यवस्थापन परिषदेच्या दोन सभा होऊनही हा विषय चर्चेला आला नाही. 22 जुलै रोजी युवासेनेच्या सदस्यांनी आग्रह करून सिनेटमध्ये हा विषय मांडला. त्यानंतर आज व्यवस्थापन परिषदेत त्यावर चर्चा झाली व चौकशीचा निर्णय घेण्यात आला.