
प्रथम नाव वक्रतुंड… दुसरे एकदंत ते… तिसरे कृष्ण पिंगाक्ष… चौथे गजवक्र ते… अशी नानाविध रूपे असलेल्या विघ्नहर्त्या बाप्पाची भुरळ परदेशी जेन झींना पडली आहे. नेदरलँड, जर्मनी, मलेशिया, मॉस्को, युरोप आदी देशांतून आलेल्या तरुणांनी अलिबागच्या वाघ्रण येथील गणेशमूर्ती शाळेला भेट दिली. तसेच त्यांनी गणशोत्सव, आभूषणांची कथा, गणेशमूर्ती कशी घडवतात याची माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी गणपती बाप्पा मोरया… असा एकच गजर केला.
हिंदुस्थानची संस्कृती, रितिरीवाज, खाद्यपदार्थ, व्यवसाय सण, उत्सव यांचा अभ्यास करण्यासाठी परदेशी तरुण-तरुणी हिंदुस्थानात आले होते. अवघ्या दोन महिन्यांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यामुळे गणेशमूर्ती तयार करण्यासाठी कारखान्यांमध्ये लगबग सुरू असून परदेशी पाहुण्यांनी अलिबागच्या निर्भय धोदरे यांच्या श्री गणेश चित्रशाळेला भेट देऊन गणेशमूर्ती निर्मितीचे कौशल्य जवळून पाहिले. कार्लेखिंड येथील प्रयास हॉस्पिटलचे डॉ. रवींद्र म्हात्रे यांनी परदेशी पाहुण्यांना मार्गदर्शन केले. तरुणांनी गणेशमूर्तीचा इतिहास, त्याच्या आभूषणांची माहिती मूर्तिकारांना विचारली. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मूर्तिकारांनी मराठीत दिली. त्याचे इंग्रजी भाषांतर ऐकल्यानंतर तरुणाई बाप्पामय झाली.
विविध देशांत भटकंती
मूर्तिकार निर्भय धोदरे, अनंत धोदरे, कृष्णा धोदरे आणि आकाश धोदरे यांनीही परदेशी युवकांना गणपतीबद्दलची माहिती दिली. यावेळी गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ हरिश्चंद्र पाटील, हेमंत पाटील उपस्थित होते. नेदरलँड, जर्मनी, मलेशिया, मॉस्को व युरोप येथून आलेल्या तरुणांची जगभर भटकंती सुरू आहे. ते विविध देशांत भटकंती करून तेथील संस्कृती समजून घेत आहेत.





























































