
ज्युनियर एनटीआर याच्या चाहत्यांसाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. आगामी ‘ड्रॅगन’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेत्याच्या खांद्याला दुखापत झाली आहे. डॉक्टरांनी त्याला पुढील ६ ते ८ आठवडे पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, त्याच्या प्रकृतीबाबत घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे त्याच्या टीमने स्पष्ट केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चित्रीकरणादरम्यान झालेल्या दुखापतीनंतर ज्युनियर एनटीआरची तातडीने वैद्यकीय तपासणी करण्यात आली. डॉक्टरांच्या टीमने त्याच्या खांद्याची सखोल तपासणी करून काही काळ कामापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. अभिनेत्याच्या अधिकृत टीमने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात सांगितले की, ” एनटीआर यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे. डॉक्टरांनी त्यांना लवकर आणि पूर्णपणे बरे होण्यासाठी सहा ते आठ आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता करण्याचे कारण नाही. त्यांच्या प्रकृतीविषयी वेळोवेळी अधिकृत माहिती दिली जाईल.” असे वृत्त एबीपी न्यूज ने दिले आहे.
ही बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी ज्युनियर एनटीआरच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. “लवकर बरे व्हा अण्णा”, “तुमच्या आरोग्यापेक्षा महत्त्वाचे काहीही नाही”, “स्वतःची काळजी घ्या” अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, ज्युनियर एनटीआरचा बहुप्रतीक्षित ‘ड्रॅगन’ हा चित्रपट दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत आहे. ‘केजीएफ’ आणि ‘सालार’ सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणाऱ्या प्रशांत नील यांच्यासोबत ज्युनियर एनटीआर पहिल्यांदाच काम करत असून, या चित्रपटात तो दमदार अॅक्शन भूमिकेत दिसणार आहे.





























































