महाराष्ट्राच्या सर्वेशने रचला राष्ट्रकुलमध्ये इतिहास; घरात गरिबी, वडील शेतकरी, पण सैन्यात आला अन् आयुष्यच बदललं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा उंच उडीपटू सर्वेश कुशारेने 2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला. सर्वेशने उंच उडी स्पर्धेत 2.25 मीटरची उडी मारली, पण त्याचे सुवर्णपदक थोडक्यात गमावले. पण असे असूनही सर्वेश राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानसाठी रौप्यपदक जिंकणारा पहिला उंच उडीपटू ठरला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत देशाला गौरव मिळवून देणारा सर्वेश कुशारे हा नाशिकचा.

वडील नाशिकमध्ये शेतकरी

सर्वेश महाराष्ट्रातील नाशिक जिह्यातील देवगावचा रहिवासी आहे. 17 जून 1995 रोजी जन्मलेला सर्वेश सध्या भारतीय सैन्यात नायब सुभेदार म्हणून कार्यरत आहे. सर्वेश एका सामान्य कुटुंबातून आला आहे, पण असे असूनही त्याने अॅथलेटिक्सची निवड केली. सर्वेशचे वडील नाशिकमध्ये शेतकरी असून ते कांद्याची लागवड करतात.

दुखापतीपासून वाचवण्यासाठी वडिलांची आयडिया

सुरुवातीच्या काळात उंच उडीसाठी मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी सर्वेशला खूप संघर्ष करावा लागला. त्यामुळे त्याने आपल्या गावातील एक स्थानिक पद्धत अवलंबली. उंच उडीमध्ये दुखापत होण्याची शक्यता जास्त असते. सर्वेशकडे तर मॅटही नव्हती. पण सर्वेशच्या वडिलांनी त्याला दुखापतीपासून वाचवण्यासाठी मक्याच्या टरफलांपासून आणि शेतातील कापसापासून एक स्थानिक मॅट तयार केली.

सर्वेश ऑलिम्पिकही खेळला

सर्वेशने 2.31 मीटर उडी मारून राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. इतकेच नाही तर 2.30 मीटरचा अडथळा पार करणारा तो पहिला हिंदुस्थानी खेळाडू आहे. आता ग्लासगोमध्ये रौप्यपदक जिंकून त्याने आपल्या कामगिरीत आणखी एका मैलाच्या दगडाची भर घातली आहे. याव्यतिरिक्त, सर्वेशने 2.26 मीटर उडी मारून मोनाको डायमंड लीग 2026 मध्ये तिसरे स्थान पटकावले होते. डायमंड लीगच्या पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवणारा तो पहिला हिंदुस्थानी उंच उडीपटूदेखील ठरला आहे. सर्वेशने 2023 च्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 2.26 मीटर उडी मारून रौप्यपदक जिंकले होते. त्यापूर्वी त्याने 2019 च्या दक्षिण आशियाई खेळांमध्ये 2.21 मीटर उडी मारून सुवर्ण पदक जिंकले होते. त्याचवेळी सर्वेशने 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्वही केले.

सैन्यात दाखल झाल्यानंतर सर्वेशचे नशीब पालटले

नाशिकच्या देवगावमध्ये उंच उडीमध्ये स्वतःला सिद्ध करणे सर्वेशला कठीण वाटले, पण नंतर त्याने राज्य स्तरावर आपली छाप पाडली. 2016 मध्ये त्याला क्रीडा कोटय़ातून सैन्यात नोकरी मिळाली. सैन्यात दाखल झाल्यानंतर सर्वेशचे नशीब पालटले. त्याला व्यावसायिक प्रशिक्षण आणि सुधारित साधनं मिळाली, ज्यामुळे त्याच्या कारकीर्दीला गती मिळाली.