
श्रीलंका दौऱ्यासाठी अखेर मंगळवारी टीम इंडियाची घोषणा झाली आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते मध्य प्रदेशच्या अनुभवी अष्टपैलू सारांश जैनच्या पहिल्याच कसोटी निवडीने. वयाच्या 33व्या वर्षी कसोटी संघात स्थान मिळालेल्या सारांशला सातत्य, संयम आणि जिद्दीची अखेर पावती मिळाली. दुसरीकडे विश्रांतीनंतर रवींद्र जाडेजाचे पुनरागमन झाल्याने हिंदुस्थानचा कसोटी संघ अधिक संतुलित झाला आहे.
…तरीही उशिरा मिळाली संधी!
वॉशिंग्टन सुंदर हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे पहिल्या कसोटीतून बाहेर पडल्याने सारांश जैनसाठी राष्ट्रीय संघाचे दरवाजे उघडले. देशांतर्गत क्रिकेट, हिंदुस्थान ‘अ’ आणि दुलीप करंडकातील सातत्यपूर्ण कामगिरीचे फळ त्याला अखेर मिळाले. 54 प्रथम श्रेणी सामन्यांत 188 बळी आणि 2,223 धावा अशी दमदार नोंद असलेल्या सारांश जैनने गेल्या रणजी हंगामात 518 धावांची लयलूट करत 30 बळीही टिपत ‘बीसीसीआय’च्या संघनिवड समितीला अक्षरशः विचार करायला भाग पाडले. शिवाय श्रीलंका ‘अ’ विरुद्धच्या अनधिकृत कसोटी मालिकेतही त्याने सात बळी घेतले, तर एका डावात नाबाद 70 धावांची खेळी करत आपले अष्टपैलुत्वाचे नाणे खणखणीत वाजवून दाखवले.
बुमराह–सुदर्शन फिटनेसच्या प्रतीक्षेत
रवींद्र जाडेजाचे अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीनंतर संघात पुनरागमन झाले आहे. फिरकी विभागात जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार आणि सारांश जैन यांच्यामुळे हिंदुस्थानकडे पर्याय उपलब्ध झाले आहेत.
नऊ वर्षांनंतर श्रीलंकेत कसोटी मालिका
टीम इंडियाचा श्रीलंका दौरा नऊ वर्षांनंतर होत असून पहिली कसोटी 15 ऑगस्टपासून गॉल येथे, तर दुसरी कसोटी 23 ऑगस्टपासून कोलंबो येथील सिंहलीज स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळविण्यात येणार आहे. त्यापूर्वी हिंदुस्थानी संघ 7 ऑगस्टपासून कोलंबो येथे चार दिवसांचा सराव सामना खेळणार आहे.
हिंदुस्थानचा कसोटी संघ ः शुभमन गिल (कर्णधार), के.एल. राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन.






























































