
मानहानीच्या दाव्यात सत्य हा बचाव असला तरी सोशल मीडियावर भ्रष्ट, घोटाळेबाज बोलणे ही बदनामीच आहे, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.
कांदिवली येथील एका पुनर्विकासावरून वाद सुरू आहे. या पुनर्विकासाची ना-हरकत मिळालेल्या बांधकाम व्यावसायिकाची व म्हाडाची सोशल मीडियावर बदनामी सुरू होती. यास प्रतिबंध करावा, अशी मागणी करत बांधकाम व्यावसायिकाने न्यायालयाचे दार ठोठावले. न्या. अभय अहुजा यांच्या एकल पीठासमोर यावर सुनावणी झाली.
सोशल मीडियावरील बदनामीचा नाहक त्रास होत आहे. व्यवसायावर याचा परिणाम होत आहे, असा युक्तिवाद बांधकाम व्यावसायिकाने केला. मात्र मी जे काही बोललो आहे ते सत्य आहे, असा दावा प्रतिवादीने केला. त्यावर न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवले.
सोशल मीडियावरील मजकूर बघता हे सर्व सत्य असल्याचे सांगितले तरी अशा प्रकारे बांधकाम व्यावसायिक व म्हाडाबद्दल वक्तव्य करणे याने केवळ बदनामीच होत नसून त्यांच्या व्यवसायावरही परिणाम होत आहे, असे न्यायालयाने नमूद केले. तसेच बांधकाम व्यावसायिक व म्हाडाची बदनामी थांबवा, असे अंतरिम आदेशही न्यायालयाने प्रतिवादीला दिले.
उत्तर सादर करा
या याचिकेचे प्रतिवादींनी उत्तर सादर करावे. या याचिकेत प्रतिवादी नसलेल्यांनीही बांधकाम व्यावसायिकाची सोशल मीडियावर बदनामी करू नये, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले. यावरील पुढील सुनावणी 31 ऑगस्टला होणार आहे.


























































