
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी २५ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीतील १६ लाख ९६ हजार लाभार्थ्यांपैकी सुमारे चार लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले असून, येत्या चार दिवसांमध्ये उर्वरित शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण होईल. त्यानंतर या सर्व शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांवर १३ हजार ६०० कोटींची रक्कम जमा करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. कर्जमाफीची दुसरी यादी ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध होईल, असेही तावरे यांनी सांगितले.
व्यापारी बँकांकडून अनुत्पादित (एनपीए) कर्ज खात्यांना, कर्ज एनपीए झालेल्या कालावधीनुसार ३५ टक्क्यांपासून ते ८५ टक्क्यांपर्यंत तडजोडीची सवलत दिली आहे. कर्जमाफी योजनेतील कर्ज खात्यांवर १ एप्रिलनंतर अतिरिक्त व्याज आकारू नये, असे निर्देशही व्यापारी बँकांना दिले आहेत. गावपातळीवर प्रसिद्ध झालेल्या यादीतील रक्कम ही तडजोडीची रक्कम आहे. यातील पात्र शेतकऱ्यांची दोन लाख रुपयांपर्यंतच्या थकीत रकमेची भरपाई शासन करणार असल्याचे तावरे यांनी स्पष्ट केले. आधार प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांची यादी बँक शाखा, उपनिबंधक कार्यालय आणि ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध करून दिली असल्याची माहिती तावरे यांनी दिली.
सर्वाधिक लाभार्थी अहिल्यानगरमध्ये
सर्वाधिक १ लाख ३२ हजार ७३४ लाभार्थी अहिल्यानगरमधील आहेत. बुलढाणा १ लाख १६ हजार ४३६, छत्रपती संभाजीनगर १ लाख ५ हजार १२८, जालना १ लाख ७ हजार ५०५ आणि यवतमाळ १ लाख १ हजार ४७० लाभार्थी आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात कमी ३ हजार ७०८ लाभार्थ्यांचा समावेश आहे.
दोन लाखांपर्यंत थकीत खात्यांचा यादीत समावेश
शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादीत दोन लाखांपर्यंत थकबाकी असलेल्या कर्ज खात्यांचाच समावेश करण्यात आला आहे. उर्वरित कर्ज खाती आणि दोन लाखांवरील कर्ज खात्यांचा समावेश यानंतर प्रसिद्ध होणाऱ्या याद्यांमध्ये करण्यात येणार असल्याचे तावरे यांनी सांगितले.
यादीत नाव नसल्यास तक्रार करण्याचे आवाहन
जे शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्र आहेत, मात्र त्यांचे नाव यादीत आले नाही, अशा शेतकऱ्यांनी जिल्हास्तरीय समिती किंवा तहसीलदार यांच्याकडे तक्रार अर्ज करावा, असे आवाहनही तावरे यांनी केले.































































