महिला जीएसटी अधिकारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात, खासगी करसल्लागारालाही घेतले ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इनपुट टॅक्स क्रेडिट अनब्लॉक करून देण्यासाठी 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 60 हजार रुपयांची लाच स्वीकारताना वस्तू व सेवा कर (जीएसटी) कार्यालयाच्या राज्यकर अधिकारी सुवर्णा लोहिया आणि खासगी कर सल्लागार अक्षय जैन (लोढा) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या धडक कारवाईमुळे लाचखोर अधिकाऱयांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

तक्रारदार यांचे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे दुकान आहे. वस्तू व सेवा कर कार्यालय जालना येथील राज्यकर अधिकारी सुवर्णा लोहिया यांनी तक्रारदार यांचे इनपुट टॅक्स क्रेडिट ब्लॉक केल्याबाबत 6 जून 2026 रोजी कारण दाखवा नोटीस पाठवली होती. त्यानुसार तक्रारदार यांनी 17 जुलै रोजी आपले टॅक्सचे काम पाहणारे खासगी कर सल्लागार अक्षय लोढा यांची भेट घेतली. त्या वेळी लोढा यांनी इनपुट टॅक्स क्रेडिट अनब्लॉक करण्यासाठी राज्यकर अधिकारी सुवर्णा लोहिया 1 लाख रुपयांची लाच मागत असल्याचे सांगितले. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लागलीच जालना एसीबीकडे तक्रार नोंदवली.

असा रचला सापळा

एसीबीच्या पथकाने 17 21 जुलै रोजी केलेल्या पडताळणीदरम्यान सुवर्णा लोहिया यांनी पंचांसमक्ष 1 लाख रुपयांची मागणी करून तडजोडीअंती 80 हजार रुपये घेण्याचे मान्य केले. तसेच कर सल्लागार अक्षय लोढा याने लाच मागण्यास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर 28 जुलै रोजी एसीबीने जीएसटी कार्यालयात सापळा रचला. तक्रारदाराकडून 60 हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारून टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने सुवर्णा लोहिया आणि अक्षय लोढा या दोघांना ताब्यात घेतले.