
शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाच्या कार्यतालिकेत शिवसेनेचे प्रकरण सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्यात आले आहे. तीन वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित आहेत. न्यायालय पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबरोबर गद्दार आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी घेणार आहे.
मूळ शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात 2023 मध्ये याचिका दाखल केली होती. तसेच गद्दार आमदारांना अपात्र ठरवण्याऐवजी पात्र ठरवणऱ्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला शिवसेनेचे मुख्य प्रतोद, आमदार सुनील प्रभू यांनी स्वतंत्र याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. शिवसेनेच्या या दोन्ही याचिकांवर गुरुवारी सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या निर्णयाकडे राजकीय वर्तुळासह संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले आहे.

























































