
मराठी संगीत रंगभूमीच्या वैभवशाली परंपरेचा आस्वाद घेण्याची सुवर्णसंधी नेहरू सेंटरने रसिकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. ११ ते १४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत वरळी येथील नेहरू सेंटर सभागृहात ३४ वा मराठी संगीत नाटक महोत्सव रंगणार असून, दररोज सायंकाळी ६ वाजता एक दर्जेदार संगीत नाटक सादर होणार आहे. विशेष म्हणजे या महोत्सवासाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आहे.
या चार दिवसीय महोत्सवात मराठी रंगभूमीवर गाजलेली ‘संगीत पद्माराणी’, ‘संगीत अनंत नारद’, ‘संगीत मत्स्यगंधा’ आणि ‘संगीत शांतिब्रह्म’ ही चार दुर्मीळ संगीत नाटके रसिकांना पाहायला मिळणार आहेत. संगीत, अभिनय आणि नाट्यपरंपरेचा सुरेल संगम अनुभवण्याची ही उत्तम संधी असून, संगीत नाटकांच्या चाहत्यांसाठी हा महोत्सव एक पर्वणीच ठरणार आहे.
मराठी संगीत रंगभूमीच्या समृद्ध वारशाचा आनंद घेण्यासाठी रसिकांनी या विनामूल्य महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. मराठी संगीत नाटकांची काहीशी खंडित झालेली परंपरा पुढे सुरू ठेवायची असेल, तर अशा उपक्रमांद्वारे जुनी नाटके रसिकांसमोर येत राहायला हवीत. नव्या पिढीला आपल्या या अमूल्य वारशाची ओळख करून देऊन, त्याच्या संवर्धनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जावी, अशी अपेक्षा आयोजक आणि कलाकारांनी व्यक्त केली आहे.






























































