
राजकीय नेत्यांचे राहणीमान, खानपान आणि त्यांची संपत्ती याबद्दल सर्वसामान्यांच्या मनात नेहमीच उत्सुकता असते. त्यात ते जर एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री असतील तर विचारूच नका. देशातील वेगवेगळ्या राज्यांचा गाडा हाकणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडे किती संपत्ती आहे हे आता असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या अहवालातून समोर आले आहे. या यादीमध्ये 1400 कोटींहून अधिक संपत्ती असणारे अब्जाधीश आणि अवघे काही लाखांची मालकी असणारे मुख्यमंत्रीही आहेत.
देशातील सर्व 31 मुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती 3,660 कोटी रुपये असून एका मुख्यमंत्र्याची सरासरी संपत्ती 118.07 कोटी रुपये इतकी आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे 1413.8 कोटी रुपयांच्या संपत्तीसह देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यापाठोपाठ आंध्र प्रदेशचे एन. चंद्राबाबू नायडू (931.83 कोटी रुपये), तमिळनाडूचे सी. जोसेफ विजय (648.85 कोटी रुपये) आणि अरुणाचल प्रदेशचे पेमा खांडू (332.56 कोटी रुपये) यांचा क्रमांक लागतो. तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांचे वार्षिक उत्पन्न 184.53 कोटी रुपये असून ते सर्व मुख्यमंत्र्यांमध्ये सर्वाधिक आहे. ‘द प्रिंट‘ने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे.
देशात अत्यंत कमी संपत्ती असलेले मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळत आहेत. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याकडे सर्वात कमी 55.24 लाख रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्याखालोखाल पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी (85.87 लाख रुपये), राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा (1.46कोटी रुपये), उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (1.54 कोटी रुपये) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (1.97 कोटी रुपये) यांचा समावेश आहे.
उर्वरित 21 मुख्यमंत्र्यांची संपत्ती 2 कोटी ते 42 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. यामध्ये मध्य प्रदेशचे मोहन यादव (42.04 कोटी रुपये), आसामचे हिमंता बिस्वा सरमा (35.16 कोटी रुपये) आणि महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस (13.27 कोटी रुपये) यांचा समावेश होतो.
तसेच 31 पैकी 14 मुख्यमंत्र्यांवर प्रलंबित गुन्हेगारी गुन्हे दाखल असून सिक्किमचे मुख्यमंत्री पी. एस. तमांग हे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी ठरलेले देशातील एकमेव विद्यमान मुख्यमंत्री ठरले आहेत. विशेष म्हणजे 31 मुख्यमंत्र्यांमध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता या एकमेव महिला मुख्यमंत्री आहेत.



























































