
शालार्थ आयडी घोटाळ्यात नाशिक येथील तपास पथकाने जळगावचे तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर आणि शेंदुर्णी येथील संस्थाचालक संजय गरूड यांना अटक केल्यानंतर खान्देशातील आणखी डझनभर संस्थाचालक आता संशयाच्या फेऱ्यात सापडले आहेत. स्वतःला शिक्षण क्षेत्रातील मातब्बर म्हणून मिरवणारे अनेक संस्थाचालक जिल्ह्यातून अचानक अज्ञात स्थळी रवाना झाले आहेत. काहीजण दोन दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’ असल्याची चर्चा आहे.
शालार्थ आयडी घोटाळ्यात ८४१ बोगस शिक्षकांची नियुक्ती झाली. यातील ६३८ बोगस शिक्षक एकट्या जळगाव जिल्ह्यातील आहेत. गरुड याच्या १५ शिक्षण संस्था आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात या घोटाळ्याची मुळे खोलवर रुजली आहेत. जळगाव जिल्ह्यातील दहा शिक्षण संस्थाचालक पोलिसांच्या रडारवर आहेत; तसेच १० मोठे मातब्बर संस्थाचालक व ४ अधिकारीही चौकशीच्या फेऱ्यात आहेत. यातील पाच ते सहा संस्थाचालक मोबाईल बंद करून अज्ञात स्थळी रवाना झाले आहेत.
सरकारची १६० कोटी रुपयांची फसवणूक करून झालेल्या ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यात भाजप पदाधिकारी तथा शिक्षणसंस्था चालक संशयित संजय भास्कर गरूड याला हृदयविकारामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी वैद्यकीय अहवाल सादर केल्यानंतर न्यायालयाने रुग्णालयातूनच चौकशीची सूचना केली आहे.
संजय गरूड याला न्यायालयाने १ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यानंतर त्याच्या छातीत दुखत असल्याच्या कारणावरून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. धुळ्यातील शिक्षण संस्थाचालक प्रशांत काडिले याला अटक झाल्यापासून गरूड सोलापुरात लपला होता. त्याने १७७ शिक्षक व कर्मचाऱ्यांना बनावट शालार्थ आयडी दिले आहेत, त्यापैकी १४१ जणांचे आदेश २८ ऑगस्ट २०१९ या एकाच दिवशी निर्गमित झाले आहेत. संजय गरुड हा नामांकित संस्थाचालक असून जामनेर तालुक्यात त्याच्या संस्थेच्या १५ ते २० शाळा कार्यरत आहेत.
शिवसेना आक्रमक
“भाजप ही भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारी कंपनी बनली आहे. शालार्थ आयडी प्रकरणात कारवाई झालेला संजय गरूड हा केवळ छोटा मासा असून, या घोटाळ्याचा खरा ‘मास्टरमाइंड’ वेगळाच आहे,” असा आरोप शिवसेना पक्षाचे जळगाव उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांनी केला आहे. यासंदर्भात शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.




























































