वरळी नाका बनला धोकादायक; अपघातांच्या घटनांत वाढ, प्रशासनाचे दुर्लक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेट्रोच्या कामादरम्यान स्थलांतरित केलेल्या डिव्हायडरमुळे वरळी नाका परिसर धोकादायक बनला आहे. रस्त्यावरील जुने डिव्हायडर उखडल्यानंतर त्या ठिकाणी ठेकेदाराने योग्य प्रकारे दुरुस्ती केली नाही. हा रस्ता सपाट (समांतर) नसल्यामुळे तेथे दुचाकीस्वारांच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत तक्रार मिळताच शिवसेनेने संबंधित अधिकाऱ्यांसमवेत या रस्त्याची पाहणी केली. दरम्यान, ठेकेदाराच्या निकृष्ट कामाबाबत संताप व्यक्त करत शिवसेनेने अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

वरळी नाका येथे मेट्रोचे काम सुरू असताना रस्त्याच्या मधोमध असलेला डिव्हायडर एका बाजूला स्थलांतरित करण्यात आला. मात्र, संबंधित ठेकेदाराने जुने डिव्हायडर उखडलेल्या ठिकाणी थातुरमातुर काम करून खड्डा भरला खरा, पण रस्ता योग्य पद्धतीने सपाट केला नाही. पावसाळ्यात पाणी साचल्यानंतर या सखल/असमतल भागातून गाडी चालवताना तोल जाऊन दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत.

याबाबत स्थानिक वाहनचालकांनी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार वरळी विधानसभा उपविभाग अधिकारी अभिजित पाटील यांनी अधिकाऱ्यांसोबत रस्त्याची पाहणी केली. रस्त्याची दुरवस्था पाहून संतापलेल्या शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. “एखादा बळी गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का?” असा सवाल त्यांनी अधिकाऱ्यांसमोर उपस्थित करत संताप व्यक्त केला. या पाहणी दौऱ्यावेळी मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी प्रतीक कोलगे, वरळी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास शिंगारे, महापालिका जी/दक्षिण विभागाचे अधिकारी सचिन गायकवाड आदी उपस्थित होते.

तत्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना

शिवसैनिकांच्या दणक्यानंतर वाहतूक पोलिसांनीही ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे अपघातात वाढ झाल्याचे मेट्रो अधिकाऱ्यांना सांगितले. एखाद्या अपघातात चालकाचा बळी गेला, तर ठेकेदारासह संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा यावेळी वाहतूक पोलिसांनी दिला. याप्रकरणी मेट्रोचे अधिकारी प्रतीक कोलगे यांनी संबंधित रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करून तो योग्य पद्धतीने सपाट केला जाईल, असे आश्वासन दिले आहे.