
>> प्रा. आशुतोष पाटील
[email protected]
सारनाथ हे भारतीय संस्कृतीचा एक मुक्त पुरातत्वीय अभिलेख आहे. येथे सापडलेले साहित्यिक संदर्भ, शिलालेख, स्मारके, शिल्पकला आणि उत्खननातून प्राप्त झालेल्या अवशेषांमधून बौद्ध धर्माच्या उदयाची आणि विस्ताराची कथा उलगडते.
25 जुलै 2026 हा दिवस भारताच्या सांस्कृतिक वारसा संवर्धनाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. दक्षिण कोरियातील बुसान येथे आयोजित युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या 48 व्या अधिवेशनात ‘प्राचीन बौद्ध स्थळ – सारनाथ’चा युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला. या मान्यतेमुळे सारनाथ हे भारताचे 45 वे जागतिक वारसा स्थळ बनले आणि अजिंठा, वेरुळ, सांची, नालंदा महाविहार आणि बोधगया यांसारख्या जागतिक कीर्तीच्या वारसास्थळांच्या पंक्तीत स्थान मिळवले. गौतम बुद्धांनी प्रथम धर्मोपदेश दिलेल्या स्थळाच्या रूपात सारनाथला शतकानुशतके कोटय़वधी भाविकांची श्रद्धा लाभली आहे; परंतु युनेस्कोची ही मान्यता केवळ त्याच्या धार्मिक महत्त्वापुरती मर्यादित नाही. उलट, दोन हजार वर्षांहून अधिक काळातील स्थापत्य विकास, कलात्मक उत्कृष्टता, बौद्ध संघजीवन आणि सांस्कृतिक सातत्य जतन करणाऱया जगातील अत्यंत महत्त्वाच्या पुरातत्वीय सांस्कृतिक परिसरांपैकी एक म्हणून सारनाथची जागतिक स्तरावर नोंद झाली आहे.
पुरातत्वज्ञांच्या दृष्टीने सारनाथ हे भारतीय संस्कृतीचा एक मुक्त पुरातत्वीय अभिलेख आहे. येथे सापडलेले साहित्यिक संदर्भ, शिलालेख, स्मारके, शिल्पकला आणि उत्खननातून प्राप्त झालेल्या अवशेषांमधून बौद्ध धर्माच्या उदयाची आणि विस्ताराची कथा उलगडते. येथील प्रत्येक वीट, प्रत्येक स्तंभ, प्रत्येक शिल्प आणि प्रत्येक शिलालेख मानवी इतिहासातील सर्वाधिक प्रभावशाली तत्त्वज्ञानांपैकी एका तत्त्वज्ञानाचा इतिहास साहित्यापुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष भौतिक पुराव्यांच्या आधारे सांगतो.
उत्तर प्रदेशातील वाराणसीपासून सुमारे दहा किलोमीटर ईशान्येस सुपीक गंगा खोऱयात वसलेले सारनाथ हे भौगोलिकदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. प्राचीन बौद्ध साहित्यात या स्थळाचा उल्लेख पाली भाषेत ‘इसिपतन’ आणि संस्कृतमध्ये ‘ऋषिपतन’ असा आढळतो. या दोन्ही नावांचा अर्थ ‘ऋषी अवतरलेले स्थान’ असा होतो. याशिवाय ‘मृगदाव’ किंवा ‘मृगदाय’ हे नावही प्रचलित होते. याचा अर्थ ‘हरिणांचे उद्यान’ असा आहे. बौद्ध परंपरेनुसार, बोधगयेत बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्तीनंतर सिद्धार्थ गौतम आपल्या पाच पूर्वसहकाऱयांचा शोध घेत सारनाथ येथे आले. याच ठिकाणी त्यांनी ‘धम्मचक्कप्पवत्तन सुत्त’ म्हणजेच ‘धर्मचक्र प्रवर्तन’ हा पहिला उपदेश दिला. या ऐतिहासिक क्षणाने केवळ बौद्ध धर्माची शिकवण सुरू झाली नाही, तर बौद्ध संघाची स्थापनादेखील झाली. त्यामुळे लुंबिनी, बोधगया आणि कुशीनगर यांच्यासह सारनाथ हे बुद्धांच्या जीवनाशी निगडित चार प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक बनले.
या घटना धार्मिक साहित्यामध्ये जतन झालेल्या असल्या तरी पुरातत्वीय संशोधन त्यांच्या ऐतिहासिक सातत्याचे ठोस पुरावे उपलब्ध करून देते. उत्खननातून उघडकीस आलेल्या वास्तू अवशेषांवरून सारनाथ अनेक शतकांमध्ये विकसित होत एक महत्त्वाचे धार्मिक आणि शैक्षणिक केंद्र बनल्याचे स्पष्ट होते. राजाश्रय, व्यापारी वर्गाचे दान आणि देश-विदेशातून येणाऱया यात्रेकरूंच्या पाठबळामुळे या स्थळाची सातत्याने भरभराट झाली. पुरातत्वीय पुरावे दर्शवितात की, बांधकाम, विस्तार, पुनर्बांधणी, विध्वंस आणि पुनरुत्थान अशा अनेक टप्प्यांतून हा सांस्कृतिक परिसर विकसित झाला, ज्यात उत्तर भारतातील बौद्ध धर्माच्या बदलत्या प्रवासाचे प्रतिबिंब दिसते.
सारनाथच्या इतिहासातील पहिला मोठा बदल सम्राट अशोकाच्या काळात, इ.स.पूर्व तिसऱया शतकात घडून आला. कलिंग युद्धानंतर अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला आणि बुद्धांच्या जीवनाशी संबंधित पवित्र स्थळांवर स्तूप, विहार, स्तंभ आणि स्मारके उभारण्याचा व्यापक कार्यक्रम हाती घेतला. अशोकाने येथे उभारलेला सिंहशीर्षयुक्त अशोकस्तंभ हा भारतीय शिल्पकलेचा सर्वोच्च नमुना मानला जातो. चुनारच्या गुळगुळीत वाळूच्या दगडातून कोरलेला हा स्तंभ मौर्यकालीन शिल्पकारांच्या अद्वितीय कौशल्याची साक्ष देतो. एकमेकांकडे पाठ करून उभे असलेले चार सिंह, त्यांच्या खाली कोरलेले हत्ती, बैल, घोडा आणि सिंह यांसह धर्मचक्राचे अंकन सार्वभौम सत्ता, नैतिक नेतृत्व आणि धर्माच्या वैश्विक प्रसाराचे प्रतीक आहे. आज हाच सिंहशीर्ष भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आला असून भारतीय राष्ट्रध्वजावरील अशोकचक्र याच स्तंभावरून प्रेरित आहे. सुमारे 2,200 वर्षांपूर्वी घडविलेले हे शिल्प आजही आधुनिक भारताच्या मूल्यांचे प्रतिनिधित्व करते.
पुरातत्वीय उत्खननातून या स्तूपाच्या अनेक विस्तार टप्प्यांचा उलगडा झाला असून, त्यावरून अनेक शतकांपर्यंत येथे धार्मिक उपक्रम सातत्याने सुरू असल्याचे स्पष्ट होते. अठराव्या शतकात या स्तूपातील विटा इमारती बांधण्यासाठी काढून नेल्यामुळे त्याचे मोठे नुकसान झाले; तथापि, उत्खननात सापडलेल्या अवशेषपेटय़ा आणि इतर पुराव्यांमुळे या स्मारकाचा इतिहास पुन्हा उभा करता आला.
त्यानंतरच्या शुंग आणि कुषाण काळात सारनाथचा मोठय़ा प्रमाणावर विस्तार झाला. नवीन स्तूप, विहारे आणि मंदिरे उभारली गेली. व्यापारी, अधिकारी, भिक्षू आणि सामान्य उपासक यांच्या दानामुळे येथे एक समृद्ध धार्मिक संस्था विकसित झाली. उत्खननात सापडलेल्या शिलालेखांमध्ये विविध दात्यांचा उल्लेख आढळतो, ज्यावरून सारनाथ हे केवळ धार्मिक केंद्र नव्हते, तर आर्थिक आणि सामाजिक देवाणघेवाणीचेही केंद्र होते.
उत्खननातून उघडकीस आलेल्या विहारांच्या अवशेषांवरून त्या काळातील स्थापत्य नियोजनाची उच्च परंपरा दिसून येते. मध्यभागी प्रशस्त अंगण आणि सभोवताली भिक्षूंच्या निवासकोठय़ा, सभागृहे, पूजास्थळे, विहिरी, पाणी निचरा व्यवस्था आणि रस्त्यांचे नियोजन यावरून मोठय़ा बौद्ध संघाचे व्यवस्थापन किती सुव्यवस्थित होते, याची कल्पना येते. त्यामुळे बौद्ध साहित्यातील वर्णने पुरातत्वीय पुराव्यांच्या आधारे अधिक स्पष्ट आणि विश्वासार्ह ठरतात. बाराव्या शतकानंतर उत्तर भारतातील बौद्ध धर्माची अधोगती सुरू झाली आणि त्याचा परिणाम सारनाथवरही झाला. विहारे ओस पडली, मंदिरे उद्ध्वस्त झाली आणि अनेक वास्तू मातीच्या थराखाली गाडल्या गेल्या. अठराव्या शतकापर्यंत काही टेकाडे आणि भग्नावशेषच या महान सांस्कृतिक केंद्राच्या अस्तित्वाची साक्ष देत उरले होते.
विशेष म्हणजे, या विध्वंसातूनच आधुनिक पुरातत्व संशोधनाला चालना मिळाली. इ.स. 1794 मध्ये बनारसचे राजा चेतसिंह यांचे दिवाण जगतसिंह यांनी धर्मराजिक स्तूपातील विटा काढण्याचे आदेश दिले. त्या वेळी स्तूपाच्या मध्यभागी असलेली अवशेष पेटी सापडली; परंतु तिचे ऐतिहासिक महत्त्व न समजल्याने त्यातील अवशेष गंगेत विसर्जित करण्यात आले. हा प्रकार दुर्दैवी असला, तरी त्यानंतर सारनाथच्या पुरातत्वीय महत्त्वाकडे विद्वानांचे लक्ष वेधले गेले आणि एकोणिसाव्या शतकात अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी सारनाथचा शास्त्राrय पद्धतीने पुनर्शोध घेतला. या पुनर्शोधाचा आढावा पाहूया पुढील लेखात.
(लेखक पुरातत्व अभ्यासक असून एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत.)

























































