नवलच! महिन्यांचा ‘जन्म’ आणि ‘बारसे’!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अरूण

कोणाचीही जन्म तारीख एखाद्या महिन्यात येऊ शकते. पण महिन्याचाच ‘जन्म’ कसा काय? जे युरोपियन कॅलेंडर आपण आज व्यवहारात वापरतो, त्यात एकेकाळी दहाच महिने होते. इटलीती} रोम शहरातील सम्राट रोम्युलस याच्या कारकीर्दीत ही कालगणना सुरू झाली. त्यांचा ‘आठवडा’ आठ दिवसांचा होता. आपल्याकडे सात दिवसांच्या ‘सप्ताहा’ची संकल्पना रुजली असली तरी आपण त्याला ‘आठवडा’च म्हणतो!

जुन्या रोमन कॅलेंडरची सुरुवात मार्च महिन्यापासून व्हायची. मार्टिअस (मार्च), एप्रिलीस (एप्रिल), मेइअस (मे), ज्युनिअस (जून), क्विन्टिलिस (आताचा जुलै), सेक्झिलिस (आताचा ऑगस्ट), सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. जुलै ते डिसेंबर महिन्यांना त्यांच्या क्रमांकांवरून नावं होती. त्यानंतरचा हिवाळ्याचा काळ हा बिनकामाचा आणि कोंदट वातावरणाचा म्हणून तसाच ‘सोडून’ दिला होता. त्यामुळे तत्कालीन वर्षगणना 304 दिवसांचीच होती. इसवी सनपूर्व 713 मध्ये न्यूमा पॉम्पिलिअस या रोमन राजाने ‘विंटर गॅप’ भरून काढण्यासाठी आणि पृथ्वीची संपूर्ण परिक्रमा वर्षगणनेत समाविष्ट करण्यासाठी ज्यॅन्युअरी आणि फेब्रुअरी हे महिने वाढवले. त्यावेळी ते वर्षाचे शेवटचे महिने होते. इसवी सनपूर्व 153 मध्ये रोमन वर्षाची सुरुवात जानेवारीपासून होऊ लागली आणि फेब्रुवारी 28 दिवसांचा झाला. युरोपियन कॅलेंडरमधल्या दोन महिन्यांचा ‘जन्म’ हा असा एका राजाच्या सुज्ञपणामुळे झाला. प्राचीन कॅलेंडरमधल्या महिन्यांची काही नावे देवतांची तर काही संख्यात्मक होती. त्यापैकी दोन महिन्यांना माणसांची नावे देण्याचे काम दोन रोमन सम्राटांनी केले.

ज्युलिअस सीझर या रोमन सम्राटाने क्विन्टिलस महिन्याला स्वतःचे नाव दिले आणि त्यानंतर ऑगस्टस सीझरने (रोमन राजाला सीझर म्हणत) सेक्झिलिस या महिन्याला ऑगस्ट हे नाव दिले. मात्र जानेवारी आणि फेब्रुवारी हे महिने वर्षाच्या प्रारंभी घेतल्याने आकडय़ांचा क्रम चुकला. जुलै सातवा तर ऑगस्ट आठवा महिना झाला. कदाचित इन्डो-युरोपियन भाषेनुसार सप्तंबर (सातवा) आणि शेवटचा डिसेंबर (दशंबर) दहावा असे असेल. त्यांची नावे तीच राहिली, पण वर्षातील क्रम मात्र बदलला. अशी ही इंग्लिश महिन्यांच्या ‘नामकरणा’ची कहाणी. 1582 मध्ये ग्रेगरी यांनी या कॅलेंडरमध्ये अधिक योग्य बदल केल्यानंतर आजची प्रचलित वार्षिक कालगणना अस्तित्वात आली.