
देशात युपीएसीचा पेपर कधी फुटत नाही, मग नीटचा पेपर कसा फुटतो? नीट प्रकरणाची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे. यासाठी एक एसआयटी स्थापन करा. सर्व पक्षीय बैठक किंवा संयुक्त संसदीय समिती स्थापन करता येते. देशाचे शिक्षण पुढे कसं असावं? UPSC ची परीक्षा होते. त्याचा पेपर कधी फुटतो का? UPSC चा पेपर फुटत नाही, पण नीटचा पेपर फुटतो, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
खरंतर अनेक कोचिंग क्लासेस असे आहेत, त्यांचे आयपीओ येत आहेत. एवढा पैसा त्यांच्याकडे झाला आहे. ते मोठा व्यवसाय करून त्यांचा सार्वजनिक कंपन्यांच्या यादीत समावेश होत आहे. हे धक्कादायक आहे. शिक्षणाचं बाजारीकरण झालं आहे. आता शिक्षण व्यवस्थेवर आम्ही चर्चा करायची नाही, तर कोणी करायची? संसद भवन त्याच्यासाठीच आहे. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून तरुणांना न्याय मिळावा, परीक्षा पारदर्शक व्हावी. जगात परीक्षा होतात, तिथे कसा पेपर फुटत नाही. आपल्याच इथे कसा पेपर फुटतो, असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला.
आधार कार्डचा चांगला कार्यक्रम हा यूपीए सरकारच्या काळात झाला. त्यामुळे प्रत्येकाला आधार मिळाला. मग ते पारदर्शक होऊ शकते, तर नीटचा पेपर होऊ शकत नाही? आता बिल आणलं, त्यात मी समाधानी नाही. राष्ट्रवादी काँग्रेसही नाही. इंडिया आघाडी देखील नाही. राजकारणी नव्हे, तर पालक म्हणूनही मी समाधानी नाही. या प्रकरणात शिक्षा होऊन फायदा नाही. तुम्ही पेपरफुटी थांबवलr पाहिजे. एखाद्याने तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करून पेपर फोडला, तर त्याच्यावर प्रशासन कोणाचं असेल? हे प्रकरण सरकारने गांभीर्याने घ्यावे. विरोधी पक्षाला विश्वासात घ्यावे. अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. त्याचा आवाज आम्हाला संसदेत ऐकू येत होता. मुलांशी प्रेमाने कोणी बोललं असतं, तर प्रश्न सुटला नसता का? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला.


























































