
आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी चाललेल्या वारकऱ्यांना ‘लालपरी’ने सुरक्षित प्रवास घडवला. महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या 5500 बसेसच्या माध्यमातून 9 लाखांहून अधिक भाविक-प्रवाशांनी सुखरूप पंढरी गाठली. भाविकांच्या या प्रवासी सेवेतून एसटी महामंडळाला 41 कोटी 18 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न प्राप्त झाले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्नात सुमारे 5 कोटी 30 लाख रुपयांची वाढ झाली आहे.
एसटी महामंडळ दरवर्षी सणासुदीला ज्यादा गाड्यांची व्यवस्था करते. गणेशोत्सव, होळी उत्सवाप्रमाणे महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरसाठी आषाढी यात्रेच्या काळात विशेष बसगाड्यांची व्यवस्था केली जाते. यंदा तब्बल 5500 बसगाड्या भाविकांच्या सेवेत चालवण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला होता. त्या बसगाड्यांना भाविकांकडूनही मोठा प्रतिसाद लाभला. त्यामुळे भाविकांच्या सेवेत धावताना एसटी महामंडळाने उत्पन्नवाढीचे उद्दीष्ट देखील पूर्ण केले आहे.
आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळाने राज्याच्या विविध भागांतून पंढरपूरसाठी विशेष वाहतुकीचे नियोजन केले होते. यात्रेच्या कालावधीत एसटीने 21 हजार 527 फेऱ्यांद्वारे 9 लाख 24 हजार 738 भाविक-प्रवाशांनी प्रवास केला. यात्रेच्या वाहतुकीतून एसटी महामंडळाला 41 कोटी 18 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्नात सुमारे 5 कोटी 30 लाख रुपयांची वाढ झाली आहे.























































