
होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये (MMC) नोंदणी देण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाला विरोध करत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (IMA) वतीने २४ तासांचे संपूर्ण कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाला आज सकाळी ६ वाजता सुरुवात झाली असून, यवतमाळ जिल्ह्यातील डॉक्टरांनी या आंदोलनात सहभाग घेतल्याने वैद्यकीय क्षेत्रात शासनाच्या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
अॅलोपॅथी आणि होमिओपॅथी या दोन स्वतंत्र उपचारपद्धती असून, त्यांची उपचारपद्धती, औषधे आणि वैद्यकीय प्रशिक्षण वेगवेगळे आहे. त्यामुळे दोन्ही पॅथी स्वतंत्र ठेवणेच योग्य असल्याची भूमिका IMAने घेतली आहे. दोन वेगवेगळ्या उपचारपद्धती एकत्र करण्याचा शासनाचा प्रयत्न वैद्यकीयदृष्ट्या योग्य नसल्याचा दावा संघटनेने केला आहे.
‘MMC’मध्ये होमिओपॅथीला प्रवेश मान्य नाही!
IMAच्या म्हणण्यानुसार, होमिओपॅथी डॉक्टरांना MMCमध्ये नोंदणी देण्याचा निर्णय वैद्यकीय नियम व उपचारपद्धतींच्या दृष्टीने योग्य नसून, या निर्णयाला संघटनेचा ठाम विरोध आहे. शासनाने IMAच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून निर्णय पुढे नेल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
‘आतापर्यंत शासनाला सहकार्य; आता सहनशक्तीची परीक्षा नको’
जनतेच्या आरोग्याशी बांधील असल्याने IMAने आतापर्यंत विविध प्रसंगी शासनाला सहकार्य केले आहे. मात्र, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या निर्णयांबाबत डॉक्टरांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्यास आता आंदोलनाची भूमिका अधिक कठोर करावी लागेल, अशी भूमिका संघटनेने व्यक्त केली.
IMAची आंदोलने अर्धवट असतात आणि काही डॉक्टर सेवा सुरू ठेवतात, त्यामुळे त्याचा फारसा परिणाम होत नाही, अशी शासनाची धारणा झाली असल्याचेही संघटनेने म्हटले आहे. ही धारणा मोडून काढण्यासाठी यावेळी २४ तास संपूर्ण कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
‘आज आणि आता नाही तर मग कधीच नाही’
शासनाच्या निर्णयाविरोधातील ही लढाई निर्णायक टप्प्यावर आली असून, डॉक्टरांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन IMAकडून करण्यात आले आहे. “आज आणि आता नाही तर मग कधीच नाही,” अशी भूमिका घेत आज सकाळी ६ वाजल्यापासून २४ तास वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या आंदोलनाला मार्ड आणि मॅगमो या संघटनांचाही पाठिंबा मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील विविध संघटनांचा शासनाच्या निर्णयाविरोधातील विरोध अधिक तीव्र झाला आहे.
रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता
२४ तासांच्या कामबंद आंदोलनामुळे यवतमाळ जिल्ह्यातील रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अत्यावश्यक आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवांबाबत संबंधित रुग्णालये व संघटनांकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे लक्ष लागले आहे.
“आम्ही शांततापूर्ण आंदोलन करीत आहोत. IMAच्या या संपामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील संपूर्ण डॉक्टर सहभागी आहेत. शिवाय आम्हाला मार्ड आणि मॅगमो संघटनांचाही पाठिंबा मिळालेला आहे. शासनाने यावर त्वरित तोडगा काढावा, ही आमची विनंती आहे.”
— डॉ. आशिष तावडे

























































