
पंढरपूरहून श्री क्षेत्र शेगावकडे प्रस्थान ठेवलेला श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा सध्या बीड जिल्ह्यात असून, वारकर्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मंगळवारी (दि.४) दुपारी बीड तालुक्यातील निसर्गरम्य श्री क्षेत्र कपिलधार येथे पालखीचे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आगमन झाले. घाटातील नागमोडी वळणांवरून चालणार्या वारकर्यांची विहंगम दृश्ये उपस्थितांचे डोळे दिपवणारी होती. कपिलधार येथे दर्शनासाठी मंगळवारी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ‘श्री गजानन महाराज की जय’, ‘गण गण गणात बोते’ अशा जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. कडक ऊन असूनही वारकर्यांच्या चेहर्यावर थकवा नव्हता, तर फक्त विठ्ठलाच्या भेटीची आस आणि गजानन महाराजांवरील भक्तीभाव दिसत होता.
कपिलधार घाटात निसर्गाचा आविष्कार आणि भक्तीचा मेळ
हिरव्यागार झाडींनी वेढलेल्या या घाटातून पांढर्याशुभ्र वस्त्रांमधील वारकर्यांची लांबच लांब रांग, डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेल्या माऊली, आणि हातात भगव्या पताका घेतलेले वारकरी… हे दृश्य अतिशय नयनरम्य आणि भक्तीमय होते. कपिलधार घाटातील तीव्र उतार आणि वळणांवरून पालखी सोहळा अतिशय शिस्तीत मार्गक्रमण करत होता. वारकर्यांच्या रांगा, त्यांच्यासोबत असलेली वाहने आणि ए़कुणच व्यवस्थापन पाहून उपस्थितांनी कौतुक केले.
पाली गावातील मुक्कामानंतर आज बीड शहरात आगमन
कपिलधार येथील पावन सोहळ्यानंतर पालखीने बीड तालुक्यातील पाली गावाकडे प्रस्थान ठेवले. मंगळवारी रात्री पाली गावात पालखीचा मुक्काम होता. येथेही ग्रामस्थांनी पालखीचे जंगी स्वागत केले. आज, बुधवारी सकाळी पाली गावाहून प्रस्थान करून गजानन महाराजांची पालखी बीड शहरात दाखल होत आहे. शहरात पालखीच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख मार्गांवरून पालखीची मिरवणूक काढण्यात येणार असून, भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.





























































