
तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी फेसबुकवरून एक व्हिडीओ प्रसिद्ध करत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ”भाजपने सोनार बांगलाला तुरुंगात बदलून टाकले आङे. राज्यात भीतीचे वातावरण पसरवणे, पोलिसांचा दुरुपयोग करणे आणि विरोधकांचा आवाज दाबणे हे सगळे प्रकार भाजपकडून सुरू आहेत, याविरोधात जनतेने व्यापक ‘जनआंदोलन’ उभारले पाहिजे असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले आहे.
पक्षाचे कार्यकर्ते, समर्थक आणि जनतेला संबोधित करताना एका व्हिडिओ संदेशात बॅनर्जी म्हणाल्या, “आमच्या कार्यकर्त्यांवर हजारो गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पंचायती, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांवर कब्जा मिळवला गेला आहे. मला वाटते की सर्वांनी आता एकत्र यायला हवे आणि एक मोठे जनआंदोलन छेडले पाहिजे. त्यांनी आमच्या ‘सोनार बांगला’चे तुरुंगात रूपांतर केले आहे. शांतता, सौहार्द आणि संस्कृतीचा बंगाल आता कुठे गेला आहे?” असा सवाल त्यांनी यावेळी केला.
भाजपवर अधिक टीका करताना त्या म्हणाल्या, “भाजपमधील काही लोक, ज्यांना येथील राजकारण आणि संस्कृतीची काहीही माहिती नाही, ते देशभक्त सुभाषचंद्र बोस यांचा अपमान करत आहेत. प्रत्येकाच्या ओठांवर ‘जय हिंद’ची घोषणा असते. मात्र नेताजी आणि रवींद्रनाथ टागोर यांना आपल्याच देशात परके केले जात असून काहींकडून त्यांची चेष्टा केली जात आहे. त्यांची भाषा ऐकून आम्हाला लाज वाटते. काही जण त्यांना देशद्रोही म्हणत आहेत, तर काही जण राजकारणाचा घाणेरडा खेळ खेळत आहेत.”
तरुण पिढीला सतर्क राहण्याचे आवाहन करत त्या म्हणाल्या, “मी तरुण पिढीला सांगू इच्छिते की त्यांनी जरा लक्ष दिले पाहिजे. बंगाल आपल्या हातातून निघून जाणार का? सत्तेत येण्यापूर्वी भाजपने काही फाईल्स उघडण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले? नेताजींचा त्यांच्याच भूमीत असा अनादर केला जाणार का?”




























































