अमली पदार्थमुक्तीसाठी अहिल्यानगरात आज जनजागृती रॅली, पोलीस दलाचा ड्रग्ज माफियांना इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करून व्यसनमुक्त समाज घडविणे आणि संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा ड्रग्जमुक्त करण्याच्या उद्देशाने अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने उद्या (दि. 6) सकाळी 7.30 वाजता पोलीस मुख्यालयातून अमली पदार्थविरोधी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत जिह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन यांनी केले. दरम्यान, ड्रग प्रकरणामध्ये पोलीस दलातील कोणाचा सहभाग आढळला, तर त्याला सेवेतून बडतर्फ करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे, पोलीस उपअधीक्षक दिलीप टिपरसे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

पोलीस अधीक्षक सुदर्शन म्हणाले, जिह्यात गेल्या दोन महिन्यांपासून अमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत असून, आतापर्यंत सुमारे 200 कारवाया करण्यात आल्या आहेत. या कारवायांमध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, 16 ते 17 आरोपींना अटक केली आहे. ड्रग्ज प्रकरणातील कोणत्याही आरोपीला पाठीशी घातले जाणार नाही. दोषी कोणताही व्यक्ती असो, त्याच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. अमली पदार्थांच्या व्यवहारात पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी सहभागी असल्याचे आढळल्यास त्यांच्याविरुद्धही कठोर विभागीय कारवाई केली जाईल. आवश्यक असल्यास अशा कर्मचाऱयांना सेवेतून बडतर्फ करण्याचीही कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

भाजपाने अमली पदार्थांविरोधात जिह्यात मोर्चा काढल्यानंतर कारवाई सुरू झाली का? असा प्रश्न विचारण्यात आला असता, ‘आम्ही त्या मोर्च्यापूर्वीच अमली पदार्थांविरोधातील कारवाई सुरू केली होती. ही मोहीम सातत्याने सुरू राहणार असून, तिचा कोणत्याही राजकीय घडामोडींशी संबंध नाही’, असे पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी स्पष्ट केले.

ड्रग्जचे जाळे केवळ शहरापुरते मर्यादित नसून, ग्रामीण आणि तालुका पातळीपर्यंत त्याचा विस्तार असल्याची शक्यता गृहीत धरून सर्व तालुक्यांमध्ये विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. स्थानिक तसेच बाहेरील ड्रग्ज माफियांच्या हालचालींवर पोलीस दलाची करडी नजर असून, संपूर्ण रॅकेटचा छडा लावण्यासाठी जिह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. अमली पदार्थांची तस्करी आणि वितरण साखळीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. तरुण पिढीचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचेही पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी नमूद केले.

विद्यार्थी, वकील, डॉक्टर, खेळाडूंचा सहभाग

उद्या (दि. 6) होणाऱया जनजागृती रॅलीमध्ये शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, वकील, पत्रकार, डॉक्टर, लोकप्रतिनिधी, शांतता समितीचे सदस्य, विविध धर्मांचे धर्मगुरू, सायकलिंग व क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक संस्था तसेच सर्वसामान्य नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित राहतील, असा विश्वास पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन यांनी व्यक्त केला आहे.