
बॉलिवूड अभिनेते राजपाल यादव यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. चेक बाऊन्स प्रकरणानंतर राजपाल यादव आता आणखी एका प्रकरणामुळे वादात सापडले आहेत. सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून राजपाल यांच्या कुटुंबाकडे 16 कोटी 61 लाख 64 हजार 638 रुपयांची थकबाकी वसूल करण्याची कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या शहाजहानपूर जिल्ह्यातील बांदा आणि खिरनी बाग येथील मालमत्तांवर लिलावाच्या नोटीस लावल्या आहेत. बँकेच्या मुंबई शाखेने थकीत कर्ज वसूल करण्यासाठी मुंबईच्या कर्ज वसुली न्यायाधिकरणाच्या (DRT) आदेशाचे पालन करत ही कारवाई केली जात आहे.
बँकेच्या म्हणण्यानुसार, अभिनेते राजपाल यादव व त्यांची पत्नी राधा यादव आणि आई गोदावरी देवी यांच्यावर 16.61 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे. या मालमत्ता लिलावातून वाचवण्यासाठी राजपाल यांच्याकडे एक शेवटची संधी आहे. त्यांच्या मालमत्तांसाठी बॅंकेने ऑनलाइन लिलाव प्रक्रिया 9 सप्टेंबर रोजी सुरू होईल, असे सांगितले आहे. जर त्यांनी या तारखेपूर्वी पैसे परत केले तर, लिलाव प्रक्रिया थांबवली जाऊ शकते. तसेच, सेंट्रल बँक ऑफ इंडिया (शहाजहानपूर शाखा) चे कायदेशीर सल्लागार वकील सुधीर श्रीवास्तव यांनी सांगितले की, यामध्ये त्यांच्या बांदा, पुवैयां तहसील क्षेत्रातील प्लॉट क्रमांक 1410, 1411, 1412 आणि 1413 मधील जमीन आणि त्यावरील इमारती लिलावासाठी सूचीबद्ध करण्यात आल्या आहेत. या लिलावात सहभागी होण्यास इच्छुक असलेल्यांना बेगमी रक्कम म्हणून 31 लाख रुपये जमा करावे लागतील.
हे प्रकरण 2012 मधील आहे. राजपाल यादव यांच्या ‘श्री नवरंग गोदावरी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीने ‘आता पता लपता’ नावाचा चित्रपट तयार केला होता. या चित्रपटासाठी अंदाजे 16 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. राजपालने या कर्जासाठी आपली पत्नी राधा यादव आणि आई गोदावरी यादव यांची मालमत्ता हमी म्हणून ठेवली होती. राजपालने या चित्रपटाची निर्मिती केली, दिग्दर्शनही केले आणि त्यात अभिनयही केला होता. पण या चित्रपट प्रेक्षकांना आवडला नाही.

























































