Ratnagiri News – महानगर गॅसमधून बोलतोय सांगून साडेसहा लाख रूपयांची फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
महानगर गॅस एजन्सीमधून बोलत असून तुमच्या गॅसचा पुरवठा बंद होणार असल्याची भीती दाखवत एका प्रौढाची तब्बल साडे सहा लाखांची फसवणूक करण्यात आली आहे.
रमेश विश्राम खापरे (54, रा.सिध्दीविनायक नगर, शिवाजीनगर,रत्‍नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. खापरे यांना मंगळवारी दुपारी त्‍यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने फोन करुन मी महानगर गॅस एजन्सीमधून बोलत असून तुमचा गॅस सप्लाय बंद होणार आहे, आम्ही तुम्हाला मदत करतो असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्‍यानंतर त्‍या अज्ञाताने फिर्यादीच्या मोबाईलवर ‘महानगर गॅस बी अपडेट’ नावाची ॲप्लीकेशन फाईल पाठवून ती फाईल फिर्यादीला उघडण्यास सांगून फिर्यादीच्या डेबीट कार्डची माहिती भरण्यास भाग पाडले.
त्यानंतर त्‍यांच्या खात्‍यातून तब्बल 6 लाख 48 हजार 612 रुपये काढून घेत ऑनलाईन फसवणूक केली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 318(4),319(2) माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66(क),66(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.