
बुलढाण्यातील जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी बहुल चारबन गावातील एका महिलेने एकाचवेळी चार बाळांना जन्म दिला आहे. रियानी पंशिराम सस्त्या असे त्या महिलेचे नाव असून तिच्या घरच्या घरी झालेल्या प्रसूतीत तीन मुलगे आणि एका मुलीला जन्म दिला. माता व चारही नवजात बालकांना पुढील उपचारासाठी खामगाव येथे हलविण्यात आले आहे.
सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या चारबन गावातील रियानी पंशिराम सस्त्या यांना बुधवारी, ५ ऑगस्ट रोजी प्रसूती वेदना सुरू झाल्या. घरच्या घरी झालेल्या प्रसूतीदरम्यान त्यांनी एकाचवेळी चार बाळांना जन्म दिला. कोणतीही विशेष वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसतानाही प्रसूती यशस्वी झाल्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने माता व नवजात बालकांना जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीनंतर आई आणि चारही बाळांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. मात्र चारही बालकांचा जन्म मुदतीपूर्व झाल्याने त्यांचे वजन सुमारे ९०० ग्रॅम ते १ किलो दरम्यान असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नवजात अतिदक्षता उपचारांची गरज लक्षात घेऊन त्यांना तातडीने खामगाव सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, एकाचवेळी चार अपत्यांचा जन्म होणे ही अत्यंत दुर्मिळ घटना असून अशा प्रसूती लाखो प्रसूतींपैकी एखाद्याच वेळी घडतात. मुदतीपूर्व जन्म झाल्याने बालकांचे वजन कमी असणे ही अपेक्षित बाब असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. विशेष म्हणजे, रियानी यांना यापूर्वी दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन अपत्ये आहेत. आता या प्रसूतीत तीन मुलगे आणि एका मुलीचा जन्म झाल्याने त्यांच्या कुटुंबातील एकूण अपत्यांची संख्या सात झाली आहे. आदिवासी भागातील मर्यादित आरोग्य सुविधा, घरच्या घरी झालेली प्रसूती आणि त्यानंतरही माता व चारही बालकांची प्रकृती स्थिर राहिल्याने ही घटना जळगाव जामोद तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे.


























































