JPSC परीक्षा तातडीने रद्द करा; AISAच्या नेहा बोरा यांचा आंदोलनाला पाठिंबा, फेरपरीक्षेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झारखंड लोकसेवा आयोग (JPSC) आणि झारखंड कर्मचारी निवड आयोग (JSSC) परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराविरोधात रांचीतील जयपाल सिंह मुंडा स्टेडियमवर विद्यार्थ्यांचे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. या आंदोलनाला ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA)च्या राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा यांनी जाहीर पाठिंबा देत १४ वी JPSC परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्याची मागणी केली.

आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना नेहा बोरा म्हणाल्या की, उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या वेदना आम्हाला समजतात, कारण आम्हीसुद्धा उपोषण केले आहे. या विद्यार्थ्यांच्या संघर्षाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून त्यांच्या सर्व मागण्यांना AISAचा पूर्ण पाठिंबा आहे.

त्या म्हणाल्या की, JPSC परीक्षांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या परीक्षेपासूनच घोटाळ्यांचे आरोप होत आले आहेत. आता १४ व्या JPSC परीक्षेतही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप समोर आला आहे. त्यामुळे १४ वी JPSC परीक्षा तातडीने रद्द करून नव्या वेळापत्रकासह फेरपरीक्षा जाहीर करावी, जेणेकरून भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण होईल.

याशिवाय, JSSC CGL परीक्षेतील कथित भ्रष्टाचाराचाही सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसला असल्याचे सांगत, ही परीक्षाही रद्द करून तातडीने फेरपरीक्षा घेण्याची मागणी त्यांनी केली.

दरम्यान, जयपाल सिंह मुंडा स्टेडियमवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी २०१९ नंतर झालेल्या JSSC CGL, JSSC JE आणि PGT या सर्व परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच या सर्व भरती प्रक्रियेतील कथित गैरव्यवहारांची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, तसेच या घोटाळ्यांमध्ये सहभागी असलेल्या कथित माफिया आणि संबंधित संस्थांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली.

भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी UR, EWS, BC-I, BC-II, SC आणि ST या सर्व प्रवर्गांतील कट-ऑफ गुण जाहीर करावेत. तसेच उमेदवारांच्या OMR उत्तरपत्रिका आणि रिस्पॉन्स शीट (Response Sheet) सार्वजनिक कराव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

याशिवाय, UPSC आणि SSC यांच्या धर्तीवर झारखंडमध्येही निश्चित भरती दिनदर्शिका (Recruitment Calendar) जाहीर करून परीक्षा आणि भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी सरकारकडे केली आहे.