
आयुष्मान भारत आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत झालेल्या गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त केले आहे. या घोटाळ्यात दोषी आढळणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. नियमबाह्यरीत्या या योजनेतून अपात्र रुग्णांना रक्कम मंजूर करणाऱ्या रुग्णालयाकडून पाचपटीने दंड वसूल केला जाईल, असा इशारा आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी दिला आहे.
एसआयटीमार्फत चौकशी सुरू
या प्रकरणी अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून शासनाने या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत एसआयटीमार्फत चौकशी सुरू केली आहे. पुढील ३० दिवसांत चौकशी अहवाल प्राप्त होईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणात विभागातील अधिकारी अथवा कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांनाही वाचवले जाणार नाही, असे शेटे यांनी स्पष्ट केले.
नाशिक जिल्ह्यात हा गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात झाला आहे. डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेचा आढावा घेतला. आतापर्यंत १ लाख ५८ हजार ६९२ रुग्णांच्या उपचारांसाठी ७६१ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून राज्यातील एकूण निधीपैकी सुमारे दहा टक्के निधी एकट्या नाशिक जिल्ह्यासाठी खर्च झाला आहे. काही मृतांच्या नावानेही उपचार दाखवून निधी उचलल्याचे उघडकीस आले आहे.
उपचारांच्या लाभात राज्यात आघाडीवर असलेल्या नाशिक जिल्ह्याची आयुष्मान कार्ड वितरणातील कामगिरी मात्र समाधानकारक नसल्याची खंत डॉ. शेटे यांनी व्यक्त केली. जिल्ह्याची लोकसंख्या ६१ लाख ६८ हजार असताना आतापर्यंत केवळ २२ लाख ५१ हजार नागरिकांनाच आयुष्मान कार्ड वितरित करण्यात आले असून हे प्रमाण अवघे ३६ टक्के आहे. त्यामुळे पुढील आठ दिवसांत कार्ड वितरण मोहिमेला गती देण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.





























































