Konkan News – वडिलांचा आधार गेला तरी हिंमत हरला नाही, गणेश मूर्तीची सेवा कायम 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
गणेशमूर्ती घडविताना वडिलांच्या हाताला हात लावणारा मुलगा… काही महिन्यांतच त्याच कार्यशाळेत वडिलांशिवाय उभा राहिला. डोळ्यांत अश्रू, मनात वडिलांच्या आठवणी आणि खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी अशा कठीण प्रसंगातही तेये-बुरंबी येथील युवा मूर्तिकार शिवम संदेश शिवलकर यांनी खचून न जाता वडिलांनी जपलेला गणरायाच्या सेवेचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार केला आहे.
तेरे-बुरंबी गावातील सुप्रसिद्ध गणेश मूर्तिकार कै. संदेश (भाई) मनोहर शिवलकर यांनी अनेक वर्षे आपल्या कलाकुसरीतून हजारो घरांमध्ये गणरायाचे आगमन घडवून आणले. त्यांच्या हस्तकौशल्याने घडलेल्या मूर्तीनी अनेक भाविकांच्या मनात स्थान मिळवले होते. मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांच्या अकस्मात निधनाने शिवलकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. वडिलांची साथ कायमची हरपल्याने संपूर्ण कुटुंब हादरले.
या दुःखातून सावरत शिवम यांनी वडिलांनी अर्धवट ठेवलेली स्वप्ने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. आई अनघा संदेश शिवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पुन्हा कार्यशाळेचे दरवाजे उघडले. ज्या हातांनी वडिलांसोबत गणरायाला आकार दिला, त्याच हातांनी आता संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. प्रत्येक मूर्ती घडविताना वडिलांची शिकवण, त्यांचा स्पर्श आणि त्यांच्या कलेची छाप जपण्याचा प्रयत्न शिवम करत आहेत. गेली सात वर्षे वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शाडूच्या गणेशमूर्ती, गकाम आणि कलात्मक सजावटीचे बारकावे शिकलेल्या शिवम यांनी यंदा १५० हून अधिकगणेशमूर्ती साकारण्याचे काम हाती घेतले आहे.
पेशवा गणपती, लालबागचा राजा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, बाळूमामा यांसारख्या विविध स्वरूपातील मूर्ती त्यांनी अत्यंत आकर्षक पद्धतीने घडवल्या आहेत. एक फूटते पावणेचार फूट उंचीच्या या शाडूच्या मूर्तीना देवरुख. भातगाव, आंबेड, तेये, माभळे, लोंढे आणि परिसरातील अनेक गावांतून मागणी येत आहे. शिवलकर कुटुंबाच्या या गणेशमूर्ती कारखान्यालाः कारखान्याला यंदा १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या शिवम यांनी नोकरीच्या वाटेऐवजी आपल्या घराण्याची कला आणि संस्कार जपण्याचा मार्ग निवडला आहे. विपरीत परिस्थितीतही न डगमगता कलेची परंपरा जिवंत ठेवणाऱ्या या युवा मूर्तिकाराचे संगमेश्वर तालुक्यासह संपूर्णपरिसरातून कौतुक होत आहे.