
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात भरमसाट वाढ झाल्यानंतर आता त्याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. इंधन दरवाढीमुळे वाढलेला वाहतूक खर्च, पॅकिंग, कच्च्या मालाच्या दरात वाढ होऊन वाढलेला खर्चामुळे गाई आणि म्हशीच्या पिशवीबंद दुधाच्या दरात दोन रुपयांनी तर दुग्धजन्य पदार्थांच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय राज्यातील प्रमुख खासगी, सहकारी दूध संघांनी घेतला आहे. ही दरवाढ 11 ऑगस्टपासून लागू होणार आहे.
राज्यातील प्रमुख खासगी आणि सहकारी दूध संघांचा समावेश असलेल्या दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांच्या बैठकीत दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. मागील काही दिवसांमध्ये डिझेल इंधनाच्या दरात प्रति लिटर 10 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. कच्च्या मालाच्या दरात 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याशिवाय दूध खरेदी दरात यापूर्वीच वाढ झाली आहे. दूध खरेदी दरात पुढील काळात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरेदी, प्रक्रिया, वेष्टन आणि वाहतूक दरात झालेल्या दरवाढीचा विचार करून दूध विक्री दरात सध्या प्रति लिटर 2 रुपयांनी आणि दुग्धजन्य पदार्थांच्या दरात 10 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
साखरेचे भावही वाढले
गणेशोत्सव ऐन तोंडावर आलेला असताना साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सणासुदीच्या काळात साखरेचे भाव वाढल्याने ग्राहकांच्या खर्चात वाढ होणार आहे. गेल्या महिन्यात साखरेची सरासरी किंमत 47.17 रुपये प्रती किलो होती ती आता वाढून 50.30 रुपये प्रती किलोपर्यंत पोहोचली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत साखरेच्या दरात जवळपास 9 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. ऐन सणासुदीत साखरेच्या किमतीत वाढ झाल्याने ग्राहकांचे बजेट बिघडणार आहे.
























































