फुकेत-दिल्ली एअर इंडियाच्या विमानातील धक्कादायक प्रकार; कॅप्टनच्या मादक चाचणीने वाढवली चिंता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंगळवारी, 4 ऑगस्टला फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला प्रवासादरम्यान, मोठ्या प्रमाणात टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला. या घटनेत विमान अचानक सुमारे 300 फूट खाली आल्याचे सांगितले जात आहे. विमान दिल्ली विमानतळावर पोहोचल्यानंतर 13 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्सना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेच्या चौकशीदरम्यान आता एक नवा आणि गंभीर मुद्दा समोर आला आहे. विमानाच्या कॅप्टनची प्रवासानंतर करण्यात आलेली ‘सायकोअॅक्टिव्ह सबस्टन्सेस’ म्हणजेच मादक किंवा मनावर परिणाम करणाऱ्या पदार्थांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे.

या वृत्तामुळे विमानाच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. फुकेतहून दिल्लीच्या दिशेने येणाऱ्या एअर इंडियाच्या Airbus A320 विमानात 145 प्रवासी होते. ओडिशाच्या आसपासच्या भागातून विमान जात असताना त्याला अचानक तीव्र टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला. असे वृत्त टाइम्स आॅफ इंडियाने दिले आहे. टर्ब्युलन्सचा धक्का इतका तीव्र होता की विमान अचानक सुमारे 300 फूट खाली आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर विमानातील काही प्रवासी आणि क्रू मेंबर्स जखमी झाले.

दिल्लीमध्ये विमान पोहोचल्यानंतर तब्बल 13 प्रवासी आणि चार क्रू सदस्यांना वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिकदृष्ट्या ही घटना हवामानातील तीव्र अस्थिरतेमुळे घडली का, याचा तपास सुरू आहे. मात्र, आता कॅप्टनच्या डोप टेस्टचा मुद्दा समोर आल्याने या चौकशीला आणखी गंभीर वळण मिळाले आहे. विमान प्रवास संपल्यानंतर नियमांनुसार क्रू मेंबर्सची सायकोअॅक्टिव्ह सबस्टन्सेससाठी तपासणी करण्यात आली. याच तपासणीत विमानाच्या कॅप्टनची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

मात्र, या दाव्याला एअर इंडियाने अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही. त्याचवेळी कंपनीने हे वृत्त फेटाळलेलेही नाही. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले की, विमान प्रवासानंतर नियमांनुसार क्रूची स्क्रीनिंग टेस्ट करण्यात आली आहे. मात्र, या चाचण्यांचे अधिकृत निष्कर्ष कंपनीला अद्याप प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे त्यावर कोणतेही भाष्य करणे सध्या शक्य नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने हेही स्पष्ट केले की, कोणत्याही विशिष्ट विमान प्रवासाशी किंवा ऑपरेशनल घटनेशी संबंध नसतानाही नागरी उड्डाण नियमांनुसार क्रू मेंबर्सची नियमितपणे अमली पदार्थांची चाचणी केली जाते. या घटनेची चौकशी नागरी उड्डाण महासंचालनालय म्हणजेच DGCA करत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.