
देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या निवासस्थानी केटरिंग सेवा सुरू केली आहे, असा टोला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. तसेच देशाचे गृहमंत्री आणि पंतप्रधान संसदेच्या सभागृहात येत नाहीत ही खेदजनक नव्हे तर लाजिरवाणी बाब आहे असा घाणाघातही संजय राऊत यांनी केला आहे.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अप्रत्यक्षपणे न्यायव्यवस्थेवर म्हणजेच सुप्रीम कोर्टावर खासदार किंवा पक्षफुटीसंदर्भात जो खटला सुरू आहे, त्याबाबत सुप्रीम कोर्टावर अप्रत्यक्ष दबाव आणत आहेत. या विषयी उद्धव ठाकरे यांनी ठाम भूमिका मांडली. पक्ष आणि चिन्हाबाबात चार वर्ष प्रलंबित असलेल्या खटल्याची सुनावणी आता सुरू झाली. ठाण्याचे जे हे टिकोजीराव आहेत, विधीमंडळातील आमदार सोडून गेले म्हणून त्यांना निवडणूक आयोगाने परस्पर पक्ष दिला आहे. आता विधीमंडळातला पक्ष वेगळा आहे आणि मूळ पक्ष वेगळा आहे. मूळ पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे असून बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेकडे हा पक्ष सोपवलेला आहे. आणि आम्ही सगळे मूळ पक्षासोबत काम करत आहोत. विधीमंडळातले 5-10 आमदार फुटले म्हणून पक्षाची मालकी एखाद्या ऐऱ्या गैऱ्याकडे कशी काय जाऊ शकते? देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या निवासस्थानी केटरिंग सेवा सुरू केली आहे. गद्दारांनी यावं आणि खाऊन जावं. तुम्हाला जेवणावळी खायला घालायला वेळी आहे. पण संसदेत तुम्ही यावे अशी मागणी करून 16 दिवस झाले, तिथे तुम्ही येऊ शकत नाहीत? या देशाची लोकशाही आणि संविधानांची विटंबना गेल्या 75 वर्षात झाली नसेल, इतकी या काळात झाली आहे असेही संजय राऊत म्हणाले.
सहा खासदारांना ढोकळा, जिलेबी फाफडा खायला घातली अशी माहिती त्या खासदारांनी दिली. त्यातल्या एका खासदाराला म्हणजे मोदी जिलबी भरवत होते. हे काय पंतप्रधानांचे काम आहे का? ज्यांच्यावर अपात्रतेचा खटला सुरू आहे त्यांना जेवायला बोलवत आहात. मी यांच्या पाठीशी आहे असे चित्र तयार करत तुम्ही न्यायालयावर दबाव टाकत आहात. पण संविधान नरेंद्र मोदींपेक्षा मोठे आहे. आणि सुप्रीम कोर्टसुद्धा मोदींपेक्षा मोठे आहे. आम्हाला खात्री आहे ते निष्पक्ष न्याय देतील. आम्हाला संविधानानुसार न्याय पाहिजे हे उद्धव ठाकरे यांचे विधान अगदी बरोबर आहे. आम्हाला मेहेरबानी नकोय किंवा आम्हाला न्याय विकत नकोय, असे संजय राऊत म्हणाले.
नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे विरोधी पक्षाच्या खासदारांना भेटत नाहीत, संसदेत येत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या खासदारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. राष्ट्रवादीच्या दोन खासदारांनी काही प्रश्नांसंदर्भात पंतप्रधानांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा सुप्रिया सुळे म्हणाल्या की सर्वच खासदारांनी जाऊ. त्यामुळे कोणीही कुठे जात नाही, कुणीही महाविकास आघाडी सोडत नाही आणि शरद पवारांची राष्ट्रावादी ही महाविकास आघाडीचा एक महत्त्वाचा घटक पक्ष आहे, पवार साहेब आमचे मार्गदर्शक आहेत.
देशाचे गृहमंत्री आणि पंतप्रधान संसदेच्या सभागृहात येत नाहीत ही खेदजनक नव्हे तर लाजिरवाणी बाब आहे. यांनी नेहरुंच्या चारित्र्याची पारायणे केली पाहिजेत. संसदीय परंपरा कशा जपाव्यात आणि संसदीय लोकशाहीत विरोधी पक्षाचा सन्मान कसा राखावा या पंरंपरांसंदर्भात मोदी आणि शहा यांनी पंडित जवाहरलाल नेहरुंच्या चारित्र्याची आणि त्यांच्या संसदेच्या कारकीर्दीची पारायणं केली पाहिजे.
शिंदे गट आणि अजित पवार गटाची मालकी ही अजित पवारांकडे आहे. अमित शहांनी या पक्षांची स्थापना केली आहे. पण लवकरचा मिंध्यांचा गट एकतर भाजपात विलीन होईल किंवा त्यांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावे लागेल. कारण सर्वोच्च न्यायालयात जो खटला सुरू आहे आणि त्यासंदर्भात आमचं संविधान सांगतं त्यानुसार त्यांना भाजपमध्ये विलीन व्हावं लागेल. त्या गटाचं अस्तित्व लवकरच संपणार आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
नाशिकमधील खड्ड्यामुळे लोक दररोज जखमी होत आहेत. अजूनही नाशिक हे मुख्यमंत्र्यांचं दत्तक शहर आहे आणि त्यांचे चंपतराय महाजन हे तिथले प्रमुख आहेत. अजूनही रस्त्याची कामं पूर्ण झालेली नाहीत. काल आमचे सर्व नगरसेवक केशव पोरजे यांच्या नेतृत्वाखाली सभागृहात गेले आणि खड्ड्यांचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली. तरी अजूनही रस्ते दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले नाही. आणि त्यासंदर्भातलं मोठं आंदोलन शिवसेना नाशिकमध्ये करणार आहेत. ते आंदोलन इतकं मोठं असेल की महाराष्ट्रातले खड्डे त्या आंदोलनामुळे भरले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकसारखे शहर दत्तक घेतात, दोनवेळा मुख्यमंत्री झाले, अजूनही त्यांचे दत्तकविधान आहे. मुख्यमंत्री नाशिकला विमानाने प्रवास करतात, मग लोकांनी प्रवास कसा करावा? लोकांनी खड्ड्यात पडून जखमी व्हायचं मरायचं? हजारो लोक गंभीर स्वरुपाने जखमी झाले आहेत. आता पर्यंत सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. सामनाने अग्रलेखही लिहिला होता. 5-6 जण कोमात आहेत. याचे गांभीर्य सरकारला नाही. फक्त ठेकेदारी सुरू आहे. आता कुंभमेळा सुरू झाला आहे, त्यामुळे फक्त ठेकेदारीचीच कामे सुरू आहेत. त्या साधुसंतांनी खड्ड्यात पडायचं का? शंकाराचार्य कुंभमेळ्याला हजर राहणार आहेत त्यांना तुम्ही खड्ड्यातून प्रवास करायला लावणार आहात का? आम्ही सरकाविरोधात आंदोलन करणार आहोत, सरकारच्या नाकर्तेविरोधात हे आंदोलन आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचे चंपतराय गिरीश महाजन यांच्याविरोधात हे आंदोलन असणार आहे. नाशिकची कशी लूट केली आणि पै पै चा हिशोब आम्ही मागणार आहोत.
धर्मेद्र प्रधान यांच्या कारभारामुळेच जेन झी चिडली. नीटचा पेपर फुटला, सतत पेपर पुढे ढकलले गेले, त्यासाठी तुम्हीच जबाबदार आहात. संघ आणि भाजपचे लोक बोलतात की जेन झी देशद्रोही आहेत. काही लोक बोलतात की टुकडे टुकडे गँग आहेत. एकदाचा काय तो निर्णय घेऊन टाका तुम्ही, असेही संजय राऊत यांनी यावेळी नमूद केले.



























































