
अमरनाथ यात्रा संपण्यास काही आठवडे बाकी असतानाच स्थगित करण्यात आली आहे. प्रतिकूल हवामान आणि भाविकांच्या संख्येत झालेली लक्षणीय घट यामुळे अमरनाथ यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, यंदा 4.7 लाखांहून अधिक भाविकांनी अमरनाथचे दर्शन घेतले. बहुतांश भाविक यात्रेच्या पहिल्या तीन आठवड्यांत आले होते, मात्र 23 जुलैपासून भाविकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. भाविकांची संख्या अत्यंत कमी झाल्यामुळे यात्रा स्थगित करण्यात आली आहे.
रविवारी जम्मूवरून भाविकांची कोणतीही नवीन तुकडी आली नाही. तसेच हवामानाबाबत इशारा देण्यात आला असून, मार्गावरील दुरुस्तीचे कामही करणे आवश्यक आहे. त्यामुळे यावर्षीची यात्रा आता संपली आहे, असे आपण म्हणू शकतो, असे कश्मीरचे विभागीय आयुक्त अंशुल गर्ग यांनी सांगितले.




























































