
नातेवाइकाला जामीन मिळावा यासाठी छत्तीसगड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांचा फोटो वापरून काळा जादू करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिलासपूर पोलिसांनी शनिवारी या प्रकरणी एका व्यक्तीची चौकशी केली. शुक्रवारी आणि शनिवारी मध्यरात्री सिपत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवारी गावातील स्मशानभूमीत हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील काही नागरिकांना रात्री उशिरा स्मशानभूमीत चार जण संशयास्पद हालचाली करताना दिसले. ग्रामस्थांनी त्यांना जाब विचारला असता त्यापैकी तीन जण घटनास्थळावरून पळून गेले. मात्र, ऋषिकेश कुमार याला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
घटनास्थळावरून मासा, लिंबू आणि कुंकूसह साहित्य जप्त
बिलासपूरचे पोलीस अधीक्षक राजनेश सिंह यांनी सांगितले की, घटनास्थळावरून तांत्रिक विधीसाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले. त्यात मासा, लिंबू, कुंकू तसेच छत्तीसगड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रमेश सिन्हा आणि अन्य दोन व्यक्तींची छायाचित्रे होती.
पोलिसांच्या चौकशीत ऋषिकेश कुमार याने दिलेल्या माहितीनुसार, त्याचा नातेवाईक प्रियंशू बोले याला काही अन्य व्यक्तींसह चाकूने हल्ला केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील एका आरोपीला जामीन मिळाला होता, तर इतर आरोपींचे जामीन अर्ज न्यायालयात प्रलंबित होते.
तांत्रिकाचा व्हिडिओ पाहून स्मशानभूमीत गेल्याचा दावा
जामीन मिळावा यासाठी तांत्रिक विधी केल्यास त्याचा फायदा होतो, असा दावा करणारा एक व्हिडिओ ऋषिकेश कुमार आणि त्याच्या मित्रांनी पाहिला होता. त्यानंतर कुमार आणि त्याचे तीन मित्र हा विधी करण्यासाठी देवारी गावातील स्मशानभूमीत गेल्याचे त्याने पोलिसांना सांगितल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
घटनास्थळावर सापडलेल्या छायाचित्रांपैकी एक छायाचित्र प्रियंशू बोले याचे होते, तर दुसरे छायाचित्र चाकूहल्ल्यातील पीडिताचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून या तांत्रिक विधीमागे नेमका कोणाचा सहभाग होता आणि इतर तीन जण कोण होते, याचा शोध पोलीस घेत आहेत.
‘तांत्रिक विधी करून जामीन मिळत नाही’
पोलीस अधीक्षक राजनेश सिंह यांनी अशा प्रकारचे विधी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला. “कोणताही तांत्रिक विधी करून जामीन मिळवता येत नाही. गुन्हेगारांनी स्वतःमध्ये सुधारणा केली पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.



























































