
तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यावर आज पश्चिम बंगालमधील हलिसाहार येथे हल्ला झाल्याची घटना घडली आहे. त्यांच्या गाडीवर जमावाकडून मोठ्या दगडांनी हल्ला करण्यात आला. पोलिसांच्या उपस्थितीतच जमावाने त्यांची गाडी अडवली आणि कारवर चिखल आणि माती फेकली. काही लोकांनी बूट आणि दगडही भिरकावले, असा आरोप त्यांनी केला. माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना त्या म्हणाल्या आहेत की, “जर गाडीची खिडकी उघडी असती, तर माझं डोकं फुटलं असतं आणि मृत्यूही ओढवू शकला असता.”.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर २४ परगणा जिल्ह्यात एका टीएमसी कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी ममता बॅनर्जी जात होत्या. त्यावेळी वाटेत बीजपूरजवळ स्थानिक लोकांनी त्यांचा ताफा अडवला.
ममता बॅनर्जी यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, “माझ्या कारवर झालेला हल्ला म्हणजे एका मोठ्या कटाचा भाग आहे. मी येथे येणार असल्याची माहिती मी आधीच पोलिसांना दिली होती, असे असूनही पोलिसांनी सुरक्षेची कोणतीही व्यवस्था केली नाही. संपूर्ण पश्चिम बंगाल सध्या गुंडांच्या नियंत्रणाखाली गेला आहे.”



























































