
अस्मिता संचालित जमनाधर अग्रवाल माध्यमिक विद्यालयात शालेय विद्यार्थी परिषद अर्थात ‘स्टुडण्ट कौन्सिल’ची स्थापना करण्यात आली. ‘निवडणूक अस्मितेची’ या उपक्रमांतर्गत विद्यालयातर्फे लोकशाही निवडणूक प्रक्रिया राबवून मंत्रीपदाच्या विविध पदांसाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीतून नवनिर्वाचित विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवड करण्यात आली. या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये, नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव आणि निर्णयक्षमता रुजावी या उद्देशाने आयोजित केलेला ‘निवडणूक अस्मितेची’ या उपक्रमातून रिया परब हिची मुख्यमंत्री पदी निवड झाली आहे. तर उपमुख्यमंत्री स्मरण जाधव, आरोग्य मंत्रीपदी तनिष्का राऊत, मानसी सोमवारे, अनुशासन मंत्रीपदी श्रीरंग दळवी, आरोही पवार, क्रीडा मंत्रीपदी दक्ष कडू, दीपाली वळवी व स्वच्छता मंत्रीपदी कुणाल घाडगे, वैदवी घोलप हे प्रचंड मतांनी निवडून आले आहेत. अस्मिता संस्थेचे विश्वस्त शिक्षण प्रकल्प प्रमुख खंडकर, मुख्याध्यापक संतोष फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.



























































