
एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी चोरी करणाऱयाला सांताक्रूझ पोलिसांनी अटक केली. चंदन मुखिया असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 51 लाखांचा ऐवज जप्त केला आहे. चोरीच्या पैशातून त्याने काही संपत्ती खरेदी केली होती अशी माहिती तपासात समोर आली आहे.
तक्रारदार या अभिनेत्री असून त्या सांताक्रूझ परिसरात राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरी चोरी झाली होती. चोरी प्रकरणी त्यानी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. सांताक्रूझ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला होता. या गुन्हय़ाची उकल करण्यासाठी एक पथक तयार केले होते. तपास पथकाने तांत्रिक माहिती, पह्नचे तपशील आणि लोकेशनचा अभ्यास केला. त्यानंतर पोलिसांचे पथक दरभंगा येथे गेले. बिहार येथून पोलिसांनी चंदनला अटक केली.
चंदन हा अभिनेत्रींच्या घरात शिरण्यापूर्वी त्याने घराची रेकी केली होती. घरात कोणी नसल्याचे लक्षात आल्यावर त्याने चोरी केली. चंदन हा चोरी करण्यासाठी बिहारहून मुंबईत येतो. मुंबईत बंद असलेली घराची रेकी करून चोरी करतो. चोरी केल्यानंतर तो एक्सप्रेसने बिहारला पळून जातो अशी त्याची गुह्याची पद्धत आहे. पोलिसांनी चंदनकडून सुमारे 51 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. चोरीला गेलेली संपूर्ण मालमत्ता पोलिसांनी हस्तगत केली नाही. त्याने चोरीच्या पैशातून बहिणीच्या नावावर जमीन खरेदी केल्याचे समजते. त्याला ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणण्यात येत होते.



























































