
हिंदुस्थानच्या बसंतकुमार मेघवालने पुरुषांच्या उंच उडीमध्ये रौप्यपदक पटकावत 20 वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत इतिहास घडवला. राजस्थानच्या गंगानगरचा 19 वर्षीय बसंतकुमार हा पुरुषांच्या उंच उडीमध्ये रौप्यपदक जिंकणारा पहिलाच हिंदुस्थानी खेळाडू ठरला हे विशेष.
अमेरिकेतील ओरेगॉनच्या युजीन येथे सुरू असलेल्या अंडर-20 जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट सुरू ठेवली आहे. बसंतने 2.06, 2.12 आणि 2.17 मीटरची उंची सहज पार केली. त्यानंतर 2.21 मीटरची शानदार उडी घेत त्याने स्वतःच्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीची बरोबरी केली. तीन खेळाडूंनी 2.21 मीटरची उंची पार केली होती, मात्र काऊंटबॅकच्या नियमानुसार बसंतच्या खात्यात रौप्यपदक जमा झाले. अल्जेरियाच्या युनिस अयाचीने सुवर्ण, तर ब्रिटनच्या ओटिस पूलने कांस्यपदक मिळवले.




























































