
कुणाही साथीदाराची मदत न घेता, कोणत्याही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न करता केवळ स्वतःच्या बुद्धीच्या आणि हिमतीच्या जोरावर रात्री-अपरात्री मुंबईत येऊन घरे पह्डणाऱया गुन्हेगारी दुनियेत ज्याला ‘वन मॅन आर्मी’ असे म्हटले जाते, त्या पंजाबच्या एका लुटारूला बोरिवलीच्या एमएचबी पोलिसांनी त्याचा माग काढून नुकतीच अटक केली व 45 लाख रुपयांची रोकड, मोबाईल पह्न, मनगटी घडय़ाळे आदी मुद्देमाल जप्त केला.
बोरिवली-दहिसरच्या पश्चिमेकडील एमएचबी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अलीकडे रात्रीच्या घरपह्डय़ांचे सत्र मोठय़ा प्रमाणात वाढले होते. घरपह्डय़ा करणारा चोर अत्यंत हुशार होता. तो कोणतेच पुरावे मागे ठेवत नव्हता, परंतु चोर कितीही चतुर असला तरी चुका या करतोच. या उणिवाच्या आधारे एमएचबी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक सोनवणे व त्यांचे सहकारी मिलिंद नागपुरे, उपनिरीक्षक संदीप वत्रे यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, उपायुक्त संदीप घुगे, सुधाकर हुंबे या अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला.
फौजदार संदीप वत्रे यांनी त्यांचे सहकारी साळुंखे, ढामळे, पवार, मस्के, घाडगे यांना सोबत घेऊन मिळालेल्या माहितीनुसार गेले अनेक दिवस नवी मुंबई येथे फिल्डिंग लावली. अखेर राजस्थान जयपूर येथे जात असताना गुजरात पोलिसांच्या मदतीने संदीप वत्रे व त्यांच्या सहकाऱयांनी झडप घालून कुलजित सिंग ऊर्फ सनी (26) या दरोडेखोराला अटक केली.
सनी याने गेल्या काही महिन्यांत बोरिवली, दहिसर येथे अर्धा डझन तसेच दादर, माहीम, काळाचौकी, आरसीएफ, धारावी, भायखळा, खेरवाडी, मानपाडा आदी ठिकाणी अडीच डझन घरफोड्या करून लाखो रुपयांची माया गोळा केली होती. असा हा लुटारू रात्रीच्या वेळेस बंद घरे पह्डताना कोणत्याही वाहनाचा वापर करायचा नाही. रेल्वेने तो प्रवास करायचा. आपले ‘लोकेशन’ किंवा ठावठिकाणा कळू नये म्हणून मोबाईलचा बिलकूल वापर करायचा नाही. आपल्या क्षमतेवर एकटय़ाने तो घर फोडायचा. एखाद्या थ्रिलर चित्रपटात जशा बँका लुटताना खलनायक दाखविला जातो, तशाच प्रकारच्या युक्तीचा वापर करून पंजाबच्या सनीने मुंबईत अलीकडे धुमाकूळ घातला होता, परंतु एमएचबी पोलिसांनी आपल्या कौशल्याचा वापर करून ‘सनी’ला गेल्या आठवडय़ात जेरबंद केले.



























































