
कॉलनीमध्ये २० वर्षांपूर्वी बांधलेल्या घरांची पुनर्बाधणी ही पुनर्विकासाऐवजी क्लस्टर योजनेमधून होत असेल तर ते या शहरासाठी फार घातक आहे. स्वतःच्या फायद्यासाठी यांनी बिल्डरांच्या नादी लागून महाराष्ट्र दहा वर्षे मागे नेला आहे, असा टोला वनमंत्री गणेश नाईक यांनी लगावला आहे. नाईक यांनी हा टोला नेमका कुणाला लगावला, अशी चर्चा नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
सानपाडा येथील कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना गणेश नाईक म्हणाले की, कॉलनी भागातील इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी क्लस्टर योजना लागू करणे हे बिल्डरांच्या घशात पैसे घालण्यासारखे आहे. मात्र कुणी जर असा प्रयत्न केला तर त्यांच्या घशातून पैसे काढण्यात येतील, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला. जनतेला गृहीत धरून कुणी नाटक करणार असेल तर त्या नाटकातील तमाशा काय आहे, हे माझ्याकडून जनतेला दाखवण्यात येईल. आम्हाला बुद्ध समजून टपली मारणार असाल तर त्याचा हात धरून त्याची लायकी दाखवण्याची ताकद माझ्यात आहे, असे फटकारेही गणेश नाईक यांनी लगावले. मात्र ज्यांना फटकारे लगावले त्यांचा नामोल्लेख नाईक यांनी टाळला. त्यामुळे त्यांचा निशाणा नेमका कुणावर आहे, या चर्चेला सध्या उधाण आले आहे.
माझा कोणत्याही व्यक्तीशी वैयक्तिक वाद नाही. मात्र जनतेला गृहीत धरून निर्णय घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला विरोध करणारच आहे. माझे हातही साफ आणि मनही साफ आहे. त्यामुळे मी कुणालाही घाबरत नाही. १९९५ पासून पालिकेच्या कामांचे ऑडिट करा, ‘दूध का दूध पानी का पानी’ होईल.
नगरसेवकांना व्हीप बजावणार
नवी मुंबईतील पुनर्विकासाच्या धोरणावर उद्या सोमवारी होणाऱ्या महासभेत चर्चा होणार आहे. या महासभेला भाजपच्या नगरसेवकांनी पूर्णवेळ उपस्थित राहावे, यासाठी व्हीप बजावण्यात येणार आहे. सभागृह नेते सागर नाईक हे या मुद्यावर प्रशासनाला जाब विचारणार आहेत. क्लस्टर धोरणातील बदलांविरोधात महासभेत विशेष ठराव मंजूर करून तो नगरविकास खात्याकडे पाठवण्यात येणार आहे, असेही नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.



























































