विद्यार्थी बनले प्रेस रिपोर्टर; खड्ड्यांची केली पोलखोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अतिदुर्गम भागातील खांडपे-कोंदिवडे या रस्त्याची खड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. याच रस्त्यावरून अनेक अडचणींचा सामना करत विद्यार्थी ज्ञान मकरंद विद्यालयात रोज जातात. या खड्ड्यांची पोलखोल करण्यासाठी चक्क विद्यार्थी ‘प्रेस रिपोर्टर’ बनले आहेत. अतिशय भन्नाट पद्धतीने केलेल्या या वृत्तांकनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर गाजत असून विद्यार्थ्यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आता तरी गेली पंधरा वर्षे प्रतीक्षेत असलेल्या रस्त्याची दुरुस्ती होईल काय, असा सवाल विचारला जात आहे.

कोंदिवडे येथील ज्ञान मकरंद विद्यालय, खांडपे येथे नववी-दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या नेहा घारे, ज्योत्स्ना आणि मानसी पवार या विद्यार्थिनी दररोज शाळा सुटल्यानंतर सुमारे दीड किलोमीटरचा रस्ता पायी चालत आपल्या खरवंडी गावाकडे जातात. रोजच्या प्रवासात रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे आणि त्यात साचलेले पाणी पाहून या मुलींनी एक दिवस चक्क पत्रकार होण्याचा निर्णय घेतला. हातातील छत्रीलाच माईक बनवत नेहा घारे हिने थेट रिपोर्टिंगला सुरुवात केली. ‘आपण सध्या कोंदिवडे रस्त्यावर आहोत. या रस्त्याबाबत तुम्ही काय सांगाल?’ असा सवाल तिने आपली मैत्रीण ज्योत्स्नाला केला. त्यावर ज्योत्स्नाने दिलेले मार्मिक उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.

आणि छत्रीचा माईक दप्तराचा कॅमेरा असा केला ग्राऊंड रिपोर्ट

‘गावातील रस्ता जणू द्रुतगती महामार्गासारखा आहे; या रस्त्यावर अशा गाड्या चालतात की त्यांच्या पोटातील पाणीही हलत नाही!’ असा टोला ज्योत्स्नाने लगावला. यानंतर या मुलींनी कॅमेऱ्यातून रस्त्याची प्रत्यक्ष परिस्थिती दाखवण्यास सुरुवात केली. रस्त्यातील खड्डे, त्यात साचलेले पाणी आणि त्यातून मार्ग काढताना नागरिक व विद्यार्थ्यांना होणारा त्रास त्यांनी आपल्या रिपोर्टिंगमधून मांडला. ‘आपण बघू शकता…’ म्हणत त्यांनी थेट ग्राऊंड रिपोर्टच्या माध्यमातून रस्त्याची पोलखोल केली. महिला, ज्येष्ठ नागरिकांचेही हाल कर्जत तालुक्यातील कोंदिवडे गावासाठी एकमेव प्रमुख रस्ता असून माजी आमदार सुरेश लाड यांच्या कार्यकाळात तो बांधण्यात आला. पण गेल्या पंधरा वर्षांपासून रस्त्याची अवस्था अतिशय बिकट आहे. याच रस्त्यावर पडलेले खड्डे पार करत विद्यार्थी रोज शाळेत जातात. लहान मुलांबरोबरच महिला, रुग्ण, ज्येष्ठ नागरिक यांनाही २० किलोमीटरचा प्रवास त्रासदायक ठरत आहे.