
दिल्ली विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात तुफान गदारोळ पाहायला मिळाला. कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच आम आदमी पार्टीच्या 6 आमदारांना मार्शलच्या मदतीने विधानसभेतून बाहेर काढण्यात आले. आमदारांनी परिधान केलेल्या आक्षेपार्ह टी-शर्टमुळे हा वाद पेटला होता.
धिवेशनाचा दुसरा दिवस सुरू होताच आपचे आमदार विधानसभेत विशिष्ट टी-शर्ट घालून आले होते. उपसभापती मोहन सिंग बिष्ट यांनी या टी-शर्टवर सर्वात आधी तीव्र आक्षेप नोंदवला. आम आदमी पार्टीच्या आमदारांनी भाजप सरकारच्या काळात झालेल्या सायकल घोटाळ्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आणि सभागृहाचे कामकाज रोखण्याचा प्रयत्न केला. यानंतर सभागृहाचे नियम मोडल्याप्रकरणी आणि शिस्तभंग केल्याप्रकरणी 6 आमदारांना मार्शलकरवी बाहेर काढण्यात आले.
STORY | 6 AAP MLAs marshalled out of Delhi Assembly
Just a few minutes after the commencement of the second day of the Monsoon Session on Monday, six AAP MLAs were marshalled out of the Delhi Assembly after Speaker Vijender Gupta asked them to remove their ”objectionable”… pic.twitter.com/SBidteNwiQ
— Press Trust of India (@PTI_News) August 10, 2026
संजीव झा, जरनैल सिंग, कुलदीप कुमार, प्रेम कुमार, सोम दत्त आणि अजय दत्त अशी विधानसभेतून बाहेर काढण्यात आलेल्या आपच्या सहा आमदारांची नावे आहेत. सततच्या सूचनेनंतरही गदारोळ न थांबल्याने मंत्री प्रवेश साहिब सिंग यांनी अध्यक्षांकडे या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. यावर अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांनी कठोर पाऊल उचलत आमदारांना बाहेर काढण्याचे आदेश दिले.
विरोधी पक्षाने जनहिताच्या महत्त्वाच्या चर्चेत अडथळा आणला आहे. विधानसभेच्या नियमांनुसार सभागृहात असंसदीय भाषा किंवा वर्तन खपवून घेतले जाणार नाही. विरोधकांनी हे लक्षात ठेवावे, असे विधानसभा अध्यक्ष म्हणाले. तसेच यावेळी अध्यक्षांनी विरोधी पक्षनेत्या आतिशी यांच्या गैरहजेरीवरही बोट ठेवले. विरोधी पक्षनेत्या आतिशी यांनी सभागृहात उपस्थित असायला हवे होते. विरोधकांनी आधी त्यांचा नेता कोण आहे हे ठरवावे, असेही अध्यक्ष म्हणाले.

























































