
सोमवारी युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यात रशियातील निझ्नेकाम्स्क शहरात एका मुलासह १३ जणांचा मृत्यू झाला, तर आणखी ४८ जण जखमी झाले, अशी माहिती तातारस्तान प्रांतातील अधिकाऱ्यांनी दिली.
रशियातील निझ्नेकाम्स्क हे शहर तेलशुद्धीकरणाचे महत्त्वाचे केंद्र आहे. येथे दोन तेलशुद्धीकरण प्रकल्प आणि एक पेट्रोकेमिकल प्रकल्प आहे. गेल्या काही महिन्यांपासून युक्रेनने लांब पल्ल्याच्या ड्रोनद्वारे रशियातील तेलसंबंधित सुविधांवर जवळपास रोज हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे रशियात इंधनटंचाई निर्माण झाली, तेलशुद्धीकरण क्षमता कमी झाली आणि रशियन जनतेत अस्वस्थता वाढली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर झेलेन्स्की यांनी ही मोहीम रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना चर्चेच्या टेबलावर आणण्यासाठी आणि चार वर्षांहून अधिक काळ सुरू असलेले त्यांचे आक्रमण थांबवण्यासाठी असल्याचे सांगितले आहे.
निझ्नेकाम्स्क हे शहर युक्रेनच्या सीमारेषेपासून सुमारे १,२०० किलोमीटर पूर्वेला असून, त्याची लोकसंख्या सुमारे २ लाख ४० हजार आहे.
युक्रेनमध्ये विकसित करण्यात आलेल्या लांब पल्ल्याच्या ड्रोनची मारक क्षमता वाढत असून ते आता रशियाच्या अधिक आतपर्यंत पोहोचत आहेत. काही ड्रोन तर सीमारेषेपासून सुमारे २,००० किलोमीटर दूर असलेल्या सैबेरियापर्यंत पोहोचत असल्याचे सांगितले जाते.
‘आम्ही पूर्णपणे न्याय्य अशी प्रत्युत्तरे देत आहोत आणि रशियाच्या प्रत्येक हल्ल्याला आमच्याकडून प्रत्युत्तर दिले जाईल. रशियाने सुरू केलेल्या युद्धाची जाणीव त्यांना त्यांच्या स्वतःच्या घरात — रशियात — अधिकाधिक होईल’, असे झेलेन्स्की यांनी रविवारी सोशल मीडियावर म्हटले होते. ‘हे अजूनही सुरू राहण्याचे एकमेव कारण म्हणजे रशियाची हे युद्ध संपवण्याची इच्छा अजूनही दिसत नाही’.
दुसरीकडे, रशियानेही क्षेपणास्त्रे, शक्तिशाली ग्लाइड बॉम्ब आणि ड्रोनचा वापर करून युक्रेनवर नियमितपणे हवाई हल्ले केले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या मते, या हल्ल्यांमध्ये नागरी भागांना लक्ष्य करण्यात आले असून हजारो नागरिकांचा बळी गेला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) युरोप कार्यालयाने सोमवारी सांगितले की, युक्रेनच्या मध्यवर्ती ड्निप्रो प्रदेशातील त्यांच्या एका गोदामावर २४ तासांपेक्षा कमी कालावधीत दोनदा हल्ला झाला.
या हल्ल्यांमध्ये अंदाजे ५ लाख डॉलर्स किमतीचा आपत्कालीन वैद्यकीय साठा नष्ट झाला. हा साठा आघाडीवरील आरोग्य सुविधांसाठी ठेवण्यात आला होता, असे संघटनेने निवेदनात म्हटले. या हल्ल्यांमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.


























































