कुंभमेळा बंदोबस्तावरील पोलिसांना जेवण, साहित्य पुरविण्याच्या पाचशे कोटींच्या बनावट वर्कऑर्डर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुंभमेळा बंदोबस्तावरील पोलिसांना जेवण व इतर साहित्य पुरविण्याच्या नावाखाली सुमारे पाचशे कोटींच्या बनावट वर्कऑर्डर वाटप करून ठेकेदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

पुंभमेळय़ाच्या बंदोबस्तासाठी तैनात राहणारे पोलीस, राज्य राखीव दलाचे जवान यांना जेवण, चटया, चादरी यांसह बादल्या व संबंधित साहित्य पुरविण्याचा ठेका देण्याच्या नावाखाली काही महाठगांनी ऑफलाइन पद्धतीने हुबेहूब अस्सल दिसणाऱया सुमारे पाचशे कोटी रुपयांच्या बनावट वर्कऑर्डर तयार केल्या. पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगरसह राज्यभरातील विविध ठेकेदार, व्यापाऱयांना त्या वाटप केल्या. त्या बदल्यात त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळले. पुरवठय़ाबाबत हालचाली होत नसल्याने आपण फसलो गेल्याचे या ठेकेदारांच्या लक्षात आले. मार्च, एप्रिलदरम्यान त्यांना या बनावट ऑर्डर देण्यात आल्या होत्या.

दिलेले पैसे परत मिळविण्यासाठी त्यांनी या ठगांकडे अनेक चकरा मारल्या. मात्र, पैसेच परत मिळत नसल्याने त्यांनी मंत्री महाजन यांच्याशी संपर्क साधला. लगेचच संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पोलीस अधिकाऱ्यांशीही चर्चा केली आहे. पैसे परत मिळण्याच्या आशेने फसले गेलेले संबंधित व्यापारी, ठेकेदार हे तक्रार करीत नाहीत. मात्र, प्रशासन स्वतःहून कारवाई करील, असे महाजन यांनी स्पष्ट केले.

जामनेर कनेक्शनमुळे खळबळ

व्यापाऱयांची फसवणूक करणारे ठग हे महाजन यांचा मतदारसंघ असलेल्या जामनेर तसेच जळगाव, धुळे या भागातील असल्याने खळबळ उडाली आहे. यापूर्वी मे महिन्यात बनावट वर्कऑर्डर दिल्याचे दोन गुन्हे नाशिक रोड, तर एक त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात दाखल आहे.