
खेड तालुक्यातील राज्य संरक्षित किल्ले रसाळगड सध्या दुरवस्थेच्या विळख्यात सापडला आहे. किल्ल्याच्या संवर्धनासाठी कोटय़वधी रुपये खर्च करून दुरुस्तीची कामे करण्यात आली तरी तटबंदीतील दगडी चिरे निखळू लागल्याने कामाच्या दर्जावरच गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे.
रसाळगड हा कोकणातील महत्त्वाचा ऐतिहासिक किल्ला असून दरवर्षी मोठय़ा संख्येने दुर्गप्रेमी व पर्यटक येथे भेट देतात. किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासनाकडून मोठय़ा प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला. या निधीतून झालेल्या कामाची गुणवत्ता तपासली का? काम झाल्यानंतर पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱयांनी पाहणी केली का? ठेकेदाराने वापरलेल्या साहित्याची आणि बांधकामाची तपासणी झाली का? ‘कोटय़वधींचा खर्च कुठे गेला?’ असे सवाल दुर्गप्रेमींकडून उपस्थित केले जात आहेत. महाराजा प्रतिष्ठानचे सचिव तथा दुर्गसेवक प्रणव मापुस्कर यांनी या परिस्थितीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष
ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाच्या नावाखाली निकृष्ट काम होत असेल, तर हा इतिहासाशीच केलेला अन्याय असल्याचे दुर्गप्रेमींचे म्हणणे आहे. कामाचा दर्जा, खर्च आणि संबंधित ठेकेदाराची जबाबदारी निश्चित करून संबंधित दोषींवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.






























































