
पोटच्या मुलानेच आपल्या ६५ वर्षीय आईचा गळा आवळून आणि फरशीवर डोके आपटून तिची निर्घृणपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना वाशी येथील सेक्टर ११ मध्ये घडली आहे. आई सुनेची बाजू न घेता मुलीची बाजू घेत होती. त्यामुळे मुलगा महेश कदम (४२) याचे आईबरोबर नेहमीच भांडण होत होते. याच भांडणातून त्याने आपल्या आईची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अवघ्या काही तासांतच बेड्या ठोकल्या आहेत.
वाशी येथे घडलेल्या या घटनेतील मृत वृद्धेचे नाव नंदा कदम (६५) असे आहे. त्या वाशी सेक्टर ११ मधील जुहूगाव येथील अष्टविनायक सोसायटीत तिसऱ्या मजल्यावर रूम नं. ३०३ मध्ये राहत होत्या. याच घरात त्यांचा मुलगा महेश कदम, त्याची पत्नी आणि मुलांसह राहत होते. नंदा कदम यांचे घरगुती कारणावरून आपल्या सुनेसोबत नेहमी भांडण होत होते. त्यामुळे आई आपल्या पत्नीला महत्व न देता ती केवळ बहिणीला महत्व देऊन तिचा संसार पाहत असल्याचा महेशचा समज झाला होता. या कारणावरून मायलेकामध्ये नेहमीच वाद होत होता. रविवारी सायंकाळीदेखील त्यांच्या घरामध्ये कौटुंबिक कारणावरून वाद होऊन भांडण झाले.

































































